झुबिन गर्ग यांची हत्याच : हिमांत सर्मा
गुवाहाटी :
सुप्रसिद्ध गायक झुबिन गर्ग यांचा मृत्यू साधासुधा नसून ती हत्याच आहे, असा स्पष्ट आरोप आसामचे मुख्यमंत्री हिमांत बिस्व सर्मा यांनी केला आहे. त्यांच्या आरोपामुळे या प्रकरणाने वेगळे वळण घेतले असून त्यांनी विधानसभेत हे विधान केल्याने या घटनेचे गांभीर्य वाढले आहे. गर्ग यांची हत्या एका व्यक्तीने केली. अन्य चार-पाच व्यक्तींनी या व्यक्तीला साहाय्य केले, असे पोलिसांच्या प्राथमिक तपासातून आढळले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री सर्मा यांनी मंगळवारी दिली. झुबिन गर्ग यांचा संशयास्पद मृत्यू सिंगापूर येथे एका जलतरण तलावात ते पोहत असताना झाला होता. त्यांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी आसाम सरकारने एकसदस्यीय आयोगाची स्थापना केली आहे. तसेच आसाम सीआयडीच्या अंतर्गत एका विशेष तपास दलाची स्थापनाही करण्यात आली आहे. या दलाने सिंगापूर येथे जाऊन पुरावे संकलित केले आहेत. गर्ग यांचा मृत्यू सर्वसामान्य परिस्थितीत झाला नसून त्यांची हत्या करण्यात आली आहे, असे त्यांच्या शवविच्छेदन अहवालातूनही स्पष्ट होते. त्यांची हत्या करण्यामागे उद्देश काय होता, हे अद्याप स्पष्ट झालेले नसून या प्रकरणात आतापर्यंत सात संशयितांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात एसआयटी अचूक आरोपपत्र सादर करणार असून सर्व गुन्हेगारांना शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही, असे आश्वासन हिमांत बिस्व सर्मा यांनी विधानसभेत चर्चेच्या प्रसंगी दिले.