‘मतचोरी’चा आरोप धादांत खोटा
लोकसभेत अमित शाह यांच्याकडून चोख प्रत्युत्तर
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेला ‘मतचोरी’चा आरोप धादांत खोटा आणि दिशाभूल करणारा आहे. अशा प्रकारे कोणीही मतचोरी करणे अशक्य असून मतदारसूचीतील काही चुकांना कारस्थानाचा रंग देणे हास्यास्पद आहे, असे प्रत्युत्तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत दिले आहे. ते बुधवारी, ‘निवडणूक सुधारणा आणि सखोल मतदारसूची पुनर्सर्वेक्षण’ या विषयावरील चर्चेचा समारोप करताना भाषण करत होते. त्यांच्या भाषणात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न राहुल गांधी यांनी अनेक वेळा केला. तथापि, शाह यांनी अत्यंत शांतपणे विरोधी पक्षांच्या प्रत्येक आरोपांचे आणि शंकांचे निरसन केले आहे.
गांधी यांनी मंगळवारी केलेल्या भाषणात अनेक आरोप केले होते. हरियाणातील संपूर्ण निवडणूकच चोरलेली आहे, हा त्यांचा मुख्य आरोप होता. त्यांनी काही उदाहरणेही दिली होती. हरियाणात 19 लाख मतांची चोरी झालेली आहे, असाही दावा त्यांनी केला होता. शाह यांनी या सर्व आरोपांचा समाचार घेतला आहे.
मतचोरीचा आरोप तथ्यहीन
केंद्रीय निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पक्ष यांनी एकत्र येऊन कारस्थान केले असून ते भारतीय जनता पक्षासाठी मतांची चोरी करीत आहेत, हे राहुल गांधी यांचे म्हणणे अत्यंत हास्यास्पद आहे. त्यांनी जी उदाहरणे त्यांच्या भाषणात आणि 5 नोव्हेंबरला त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहेत, तीही बनावट आणि गैरसमजुतीतून निर्माण झालेली आहेत. हरियाणात एकच घर क्रमांकाच्या 501 मतदारांनी मतदान केले आहे, असा गांधी यांचा आरोप आहे. तथापि, निवडणूक आयोगाने त्याचे उत्तर दिले आहे. हे लहान घर नसून एक एकरचा भूखंड आहे. या भूखंडात अनेक कुटुंबे राहतात. त्यांची घरे या भूखंडात आहेत. तथापि, या घरांना स्वतंत्र क्रमांक देण्यात आलेले नाहीत. ही घरे तेथे 11 वर्षांपूर्वीपासून, म्हणजे काँग्रेसचे सरकार हरियाणात होते, तेव्हापासून आहेत. त्यावेळीही त्यांना स्वतंत्र क्रमांक देण्यात आले नव्हते. त्यामुळे आजही हे सर्व मतदार आपला पत्ता याच भूखंडाचा क्रमांक घालून देतात. याचा अर्थ हे मतदार बनावट आहेत, असा होत नाही. ते खरेच मतदार आहेत. त्यांनी आजवर अनेक निवडणुकांमध्ये मतदान केले आहे. त्यांना बनावट मतदार ठरवून त्यांचा अपमान करण्याचा अधिकार गांधी यांनी नाही, असे सडेतोड उत्तर शाह यांनी दिले आहे.
ब्राझीलच्या मॉडेलसंबंधी आरोप
ब्राझीलच्या एका मॉडेल महिलेच्या नावावर आणि छायाचित्रावर 22 महिला मतदारांची नोंद आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत केला होता. त्यांचा तो ‘हैड्रोजन बाँब‘ फुसका निघाला. कारण या सर्व महिला मतदार अस्तित्वात आहेत. त्यांनी स्वत: पुढे येऊन हे स्पष्टीकरण दिले आहे. काहीवेळा मतदारसूची तयार करत असताना चुका राहून जातात. मृत मतदारांची नावे वगळण्याचे राहून जाते. काही मतदारांची नावे अनेक मतदान केंद्रांवर असतात. काहीवेळा नाव चुकीचे असते, तर काहीवेळा छायाचित्र चुकीचे असते. पण हे कारस्थान नसून या अनवधानाने घडलेल्या चुका असतात. त्या दुरुस्त करण्यासाठीच केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘सखोल मतदारसूची पुनर्सर्वेक्षण’ अभियान हाती घेतले आहे. ते पूर्ण झाल्यानंतर पुष्कळशा चुका ठीक होतील. तेव्हा कोणी चिंता करण्याचे कारण नाही, असे प्रतिपादन अमित शाह यांनी केले.
अनुभव आवश्यक
ही सर्व प्रक्रिया समजून घेण्यासाठी संयम आणि अनुभवाची आवश्यकता आहे. विषय नीट समजून घेतला तर परिस्थिती लक्षात येते. केवळ लोकांची दिशाभूल करण्यासाठी आरोप करणे योग्य नाही. तसेच, बिनबुडाचे आरोप करुन व्यवस्थेविषयी लोकांच्या मनात शंका किंवा अविश्वास निर्माण करणेही अयोग्य आहे. अशा चुका नेहरुंच्या काळापासून आहेत, असे शाह यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसच कारणीभूत
मृत मतदार किंवा घर सोडून अन्यत्र गेलेले मतदार यांची नावे मतदारसूचीतून वगळण्याचा अधिकार मतदानकेंद्र अधिकाऱ्यांना होता. तथापि, 2010 मध्ये काँग्रेस सरकारनेच तो अधिकार काढून घेतला आहे. त्यामुळे मृत मतदारांची नावे आढळत आहेत. तसेच काही मतदारांची नावे अनेक मतदान केंद्रांवर नोंद आहेत. या प्रकाराला एक प्रकारे काँग्रेसही कारणीभूत आहे, हे शाह यांनी दर्शवून दिले आहे.
सोनिया गांधींचे नाव कसे...
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी भारताचे राष्ट्रीयत्व घेण्यापूर्वीच त्यांचे नाव दिल्लीतील मतदारसूचीत आल्याचे प्रकरण सध्या गाजत आहे. दिल्ली उच्च न्यायालयातही हे प्रकरण पोहचले आहे. हे काँग्रेसचे कारस्थान होते काय, असा प्रतिप्रश्नही अमित शाह यांनी राहुल गांधी यांच्या आरोपांना उद्देशून केला आहे.
शाह-गांधी यांच्यात शब्दयुद्ध
अमित शाह यांचे भाषण होत असताना अनेकदा राहुल गांधी यांनी त्यांना रोखण्याचा आणि हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. हरियाणात तुम्ही निवडणूक चोरली आहे. यावर जाहीर वादविवाद करण्यास मी तयार आहे तुम्ही माझ्याशी वाद करण्याचे आव्हान मी तुम्हाला देतो, अशा भाषेत गांधी यांनी त्यांना टोकण्याचा प्रयत्न केला. तथापि, शाह यांनी अत्यंत शांतपणे त्यांना प्रत्युत्तर दिले. आपल्या प्रत्येक आरोपाचे खंडन करण्यासाठीच मी येथे आहे. माझ्या भाषणाचा क्रम तुम्ही ठरवू शकत नाही. तुम्ही संयमाने आणि शांतपणे माझे उत्तर ऐका. तुमच्या शंका दूर होतील, असे गांधी यांना समजावत शाह यांनी गांधी यांचे सर्व आरोप माहिती आणि आकडेवारीसह खोडून काढल्याचे दिसून आले आहे.
लोकसभेतील वादळी चर्चा पूर्ण
ड ‘एसआयआर’वर लोकसभेतील वादळी चर्चेची बुधवारी संध्याकाळी समाप्ती
ड गुरुवारी याच विषयावर राज्यसभेत होणार तब्बल दहा तासांची मोठी चर्चा
ड राहुल गांधी यांच्या प्रत्येक आरोपाला अमित शाह यांचे माहितीसह प्रत्युत्तर