जसदीप सिंह गिल यांना झेडप्लस सुरक्षा
डेरा राधा स्वामी ब्यासचे नवे प्रमुख
वृत्तसंस्था/ अमृतसर
जसदीप सिंह गिल अलिकडेच डेरा राधा स्वामी ब्यासचे नवे प्रमुख झाले आहेत. डेरा राधा स्वामी ब्यासचे प्रमुख होताच त्यांना असलेला धोका वाढला आहे. गुप्तचर यंत्रणांना जसदीप गिल यांना असलेल्या धोक्यासंबंधी काही इनपूट देखील मिळाले आहेत. याचमुळे केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने गिल यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली आहे.
डेरा राधा स्वामी ब्यासचे नवे प्रमुख जसदीप सिंह गिल यांना पेंद्र सरकारच्या वतीने झेड प्लस सुरक्षा पुरविण्यात आली आहे. जसदीप सिंह गिल हे आता जेव्हा अन्य राज्यात किंवा विदेश दौऱ्यावर गेल्यास त्यांना त्या राज्यातील सरकार आणि प्रशासनाही सुरक्षा पुरविणार आहे. गुप्तचर यंत्रणांना जसदीप सिंह गिल यांना असलेल्या धोक्याविषयी इनपूट मिळाल्यानेच त्यांची सुरक्षा वाढविण्यात आली आहे.
डेरा राधा स्वामी ब्यासचे प्रमुख झाल्यावर जसदीप गिल यांच्या सुरक्षेला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे गुप्तचर यंत्रणांना आढळून आले होते. झेड प्लस सुरक्षा ही भारतातील सुरक्षेची सर्वोच्च श्रेणी मानली जाते. यात 10 हून अधिक एनएसजी कमांडो, पोलीस कर्मचाऱ्यांसमवेत 55 जवानांकडून सुरक्षा पुरविली जात आहे. ही सुरक्षा व्यवस्था सर्वात उच्चस्तरीय असते आणि याचमुळे केंद्र सरकार किंवा पोलीस केवळ विशेष व्यक्तीला धोक्यापासून वाचविण्यासाठी ही सुरक्षा व्यवस्था प्रदान करतात.
2 सप्टेंबर रोजी डेरा ब्यास प्रमुख बाबा गुरिंदर सिंह ढिल्लो यांच्याकडून जसदीप सिंह गिल यांना स्वत:चा उत्तराधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले होते. या डेऱ्याचे पंजाब तसेच हरियाणात मोठ्या संख्येत अनुयायी आहेत.