ZP Schools : जिल्हा परिषद शाळांचा नादच खुळा!, मॉडेल स्कूलला 5 लाखांचे बक्षीस जाहीर
संपूर्ण सांगली जिल्ह्यात गुणवत्तापूर्ण आणि उपक्रमशील शाळा, अशी ओळख निर्माण झाली आहे.
सोन्याळ : जत तालुक्यातील जिल्हा परिषद मॉडेल स्कूल जत नं. १ या शाळेने 'मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा' उपक्रमांतर्गत शैक्षणिक वर्ष २०२४- २५ मध्ये जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शाळेला पाच लाख रुपयांचे पारितोषिक मिळाले आहे. मागील वर्षीही (२०२३-२४) तालुकास्तरावर प्रथम क्रमांक मिळवून शाळेने तीन लाखांचे बक्षीस जिंकले होते. वरिष्ठ मुख्याध्यापक संभाजी कोडग यांच्या संकल्पनेतून या शाळेने गेली सात बर्ष सातत्याने गुणवत्ता, उपक्रमशीलता आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कठोर मेहनत घेतली आहे.
त्यामुळे शाळेकडे पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा वाढता कल पाहायला मिळतो आहे. सध्या ही शाळा प्राथमिक (१ली ते ५ वी) पटात जिल्ह्यात अब्बल क्रमांकावर आहे. गेल्या सात आठ वर्षात ७० पटसंख्येवरून ४५० पटसंख्या या शाळेची झाली आहे. संपूर्ण सांगली जिल्ह्यात गुणवत्तापूर्ण आणि उपक्रमशील शाळा, अशी ओळख निर्माण झाली आहे. मागील तीन वर्षांपासून येथे प्रवेशासाठी बेटिंग यादी लागते आहे.
शाळेच्या यशामागे शिक्षण विभागाचे अधिकारी, शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षकवृंद यांचे योगदान महत्त्वाचे आहे. जत पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी राम फरकांडे, विस्तार अधिकारी अन्सार शेख, तानाजी गवारी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष देवकर, माजी अध्यक्ष मोहन माने पाटील, उपाध्यक्ष रोहिणी जाधव व इतर सदस्य यांचे मोलाचे सहकार्य आणि मार्गदर्शन मिळत आहे. शाळेचे वरिष्ठ मुख्याध्यापक संभाजी
कोडग यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील शिक्षक वृंद सुजाता कुलकर्णी, आशा हावळे, सुनीता कदम, मीनाक्षी शिंदे, हनुमंत मुंजे, संगीता कांबळे, रेवती कुंभार, विष्णू फोंडे, विशाखा सावंत, स्मिता कुलकर्णी, ज्योती भोसले, श्रीदेवी कांबळे, प्रिया कोरे आदी शिक्षक तसेच पालक आणि विद्यार्थ्यांचा समन्वय या यशाचा मुख्य घटक ठरला आहे.
गुणवत्तेचा लौकिक वाढला
प्रवेशासाठी तीन वर्षांची वेटिंग यादी जत येथील जिल्हा परिषद प्राथमिक मॉडेल स्कूल क्र. १ या शाळेने आपल्या गुणवत्ता शिक्षण, उपक्रमशीलता आणि शिस्तीच्या माध्यमातून जिल्ह्यात मानाचं स्थान मिळवलं आहे. परिणामी, प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची मागणी इतकी वाढली आहे की, गेली तीन वर्षे बेटिंग यादी कायम आहे. या शाळेची वैशिष्ट्ये म्हणजे केवळ शैक्षणिक प्रगती नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देणे. खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम, उपक्रमशीलता, विज्ञान प्रदर्शने अशा विविध माध्यमांतून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव दिला जातो. त्यामुळेच ही शाळा जिल्ह्यात पहिल्या पाच क्रमांकांमध्ये स्थान पटकावणारी मानाची शाळा ठरली आहे.
उल्लेखनीय उपक्रम आणि यश
या शैक्षणिक वर्षात शाळेने विविध सांस्कृतिक, शैक्षणिक आणि क्रीडा स्पर्धांमध्ये आपली छाप पाडली आहे. लोकनृत्य स्पर्धा : जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक गायन, अभिवाचन, वक्तृत्व, प्रकट बाचन, एकांकिका, रायम्स: तालुक्यात प्रथम क्रमांक, जिल्हास्तरासाठी निवड इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा : ५ विद्यार्थी पात्र,
डॉ. पतंगराव कदम गुणवत्ता शिष्यवृत्ती परीक्षा: इयत्ता १ ली - ६ विद्यार्थी, २ री ४ विद्यार्थी, ३ री - १६ विद्यार्थी, ४थी २ विद्यार्थी, ५वी - ८ विद्यार्थी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय यश अबॅकस स्पर्धा : विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावर यश, मंथन परीक्षा विभाग व राज्य स्तरावर गुणवत्ता, अक्षरगंगा स्पर्धा : जिल्हास्तरावर प्राविण्य, स्केटिंग स्पर्धा विभाग ब राज्यस्तरावर घवघवीत यश, क्रीडा स्पर्धा: राज्यस्तरावर चमकदार कामगिरी.