Kolhapur News : कोल्हापुरात सोलापूरसारखी आयटी पार्क सुविधा निर्माण होणार
03:01 PM Dec 14, 2025 IST | NEETA POTDAR
Advertisement
कोल्हापुरात आयटी क्षेत्रामुळे हजारो रोजगारनिर्मितीची शक्यता
Advertisement
नागपूर : कोल्हापूरला आयटी क्षेत्रासाठी चांगली संधी आहे. हेच क्षेत्र वाढविण्याची क्षमता कोल्हापूरमध्ये आहे. आयटी क्षेत्रासाठी कोल्हापूर शहर पूरक असतानाही जागेअभावी रोजगार निर्मितीत मागे पडले आहे. आयटी क्षेत्र झाल्यास सुमारे हजारोंच्या संख्येत रोजगार निर्मिती होणार आहे. याचा फायदा कोल्हापूर जिल्ह्यातील स्थानिक युवक- युवतींना होणार आहेच. त्याचबरोबर पर्यायाने कोल्हापूरच्या आर्थिक उत्पन्नात भर होणार आहे.
कोल्हापुरात आय.टी. पार्क निर्माण करण्यासाठी जागा देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री यांच्याकडे प्रलंबित होते. याबाबत आमदार राजेश क्षीरसागर यांनी गत पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी प्रश्नाद्वारे विधिमंडळाचे लक्ष वेधले होते. सदर प्रश्नावर उत्तर देताना राज्यमंत्री ना.इंद्रनील नाईक यांनी बैठक घेवून प्रश्न मार्गी लावण्याबाबत सभागृहास आश्वासित केले होते. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या सातत्याच्या पाठपुराव्यास यश आले असून, आय.टी.पार्क निर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आय.टी.पार्क स्थापनेसह जागा उपलब्धतेच्या प्रस्तावास शासनाने मंजुरी दिली असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. याबद्दल मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांचे आभार मानत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
या पत्रकात पुढे म्हंटले आहे कि, भारताला २०४७ पर्यंत जागतिक महासत्ता बनविण्याचे स्वप्न देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांनी पाहिले आहे. यासाठी केंद्र शासनाने नीती आयोग व राज्य शासनाने मित्र संस्थेची स्थापना केली आहे. मित्र संस्थेच्या माध्यमातून कोल्हापूरला शाश्वत विकास परिषद घेण्यात आली. यामध्ये फौंड्री, वस्त्रोद्योग, कृषि, आय.टी., पर्यटन या पाच क्षेत्रांचा विकास करण्याबाबत निर्णय घेण्यात आले. मित्र संस्थेच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात धोरणात्मक योजना आखलेल्या आहेत. यासह महा स्ट्राइड प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्यातील विकासाची क्षमता ओळखून प्रत्येक जिल्ह्यात स्ट्रॅटेजिक प्लॅन राबवतानाच आय.टी. क्षेत्राशी संलग्न असणारा डेटा सेंटर तयार करण्याचे नियोजन शासनाने केले आहे.
या डेटा सेंटर सोबतच आयटी क्षेत्राशी संबंधित पायाभूत सोयी सुविधा प्रत्येक जिल्ह्यात निर्माण झाल्यास आय.टी क्षेत्र चांगल्या पद्धतीने तयार होईल. प्राथमिक स्वरूपात सोलापूर येथे आय.टी. पार्क स्थापनेस शासनाने मंजुरी दिली होती. तसेच कोल्हापूरमध्ये शेंडा पार्क येथे आरोग्य व कृषि विभागाच्या जागा आय.टी.सह विविध विभागांना देण्याचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित होता. याबाबत मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, तत्कालीन मुख्यमंत्री व सद्याचे उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांचेकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला. या पाठपुराव्यास यश प्राप्त झाले असून, शेंडा पार्क येथील आय.टी.पार्क सह इतर शासकीय प्रयोजनांसाठी आवश्यक जागा मागणी प्रस्तावास शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे आगामी काळात कोल्हापूरच्या विकासाचे सुवर्णद्वार आय.टी.पार्क च्या माध्यमातून खुले होणार असल्याचेही आमदार राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.
Advertisement