For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शाळा घडवा, लाखोंची बक्षिसे मिळवा! सर्व व्यवस्थापन व माध्यमांच्या शाळांमध्ये राबविले जाणार अभियान

07:47 PM Dec 21, 2023 IST | Abhijeet Khandekar
शाळा घडवा  लाखोंची बक्षिसे मिळवा  सर्व व्यवस्थापन व माध्यमांच्या शाळांमध्ये राबविले जाणार अभियान
Kolhapur ZP
Advertisement

गुणवत्ता, सुविधा, पटसंख्या व अन्य उपक्रमांचे होणार मुल्यांकन

कोल्हापूर प्रतिनिधी

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा योजनेतंर्गत जिल्हयात ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियान राबविण्याचे राज्यशासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या आदेशाने निश्चित केले आहेत. या अभियानातून शाळेची गुणवत्ता वाढवून लाखोंची बक्षिसे मिळवण्याची संधी शाळांना मिळणार आहे. या संदर्भात सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या शाळेमधील गुणवत्ता, सुविधा, पटसंख्या व अन्य उपक्रमांवरून मुल्यांकन केले जाणार आहे. या अभियानात सर्व शाळांनी सहभागी व्हावे, असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांनी केले आहे.

Advertisement

तालुका, जिल्हा आणि विभाग स्तरावर जाणाऱ्या शाळांना प्रत्येक स्तरावर लाखों रूपयांची बक्षिसे घोषित करण्यात आलेली आहेत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसोबत अध्ययन, अध्यापन व प्रशासनात आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहन देणे, शिक्षणासाठी पर्यावरण पुरक व आनंददायी वातावरण निर्मिती करणे, क्रोडा, आरोग्य व स्वच्छतेचे महत्व अधोरेखित करणे राष्ट्रप्रेम व राष्ट्रीय एकात्मता याबाबत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे, व्यवसायिक शिक्षणाचे महत्व पटवून देणे, व्यक्तीमत्वाच्या जडणघडणीसाठी विद्यार्थ्यांच्या अंगभूत गुणांना प्रोत्साहन देणे, शिक्षक, विद्यार्थी, पालक माजी विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयीची भावना निर्माण करणे आदी उद्दिष्टे साध्य करण्यासाठी हे अभियान राबविले जाणार आहे.

विद्यार्थी केंद्रीत उपक्रमाचे आयोजन व त्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग याला 60 गुण, शाळा व्यवस्थापनाकडून आयोजित उपक्रम व त्यातील विविध घटकांचा सहभाग याला 40 गुण असे 100 गुणांपैकी एखादी शाळा किती गुण पटकावते, त्यानुसार शाळेची बक्षिसासाठी निवड केली जाणार आहे. शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा एका गटात तर दुसऱ्या गटात खाजगी व्यवस्थापनांच्या शाळा अशा दोन गटांत शाळांचे मुल्यांकन केले जाणार आहे.

Advertisement

राज्य स्तरावर प्रथम येणाऱ्या शाळेला मिळणार 51 लाख
या अभियानात तालुका स्तरावर अव्वल ठरणाऱ्या शाळेसाठी पहिले बक्षिस 3 लाखांचे, दुसरे 2 लाखांचे तर तिसरे बक्षिस 1 लाखाचे दिले जाणार आहे. जिल्हा स्तरावर बक्षिसांची रक्कम अनुक्रमे 11 लाख, 5 लाख व 3 लाख राहिल. तर विभाग स्तरावर झेप घेणाऱ्या शाळेला पहिले बक्षिस 21 लाख, दुसरे बक्षिस 11 लाखांचे आणि तिसरे बक्षिस 7 लाखांची रक्कम दिली जाणार आहे. तसेच राज्यातून अव्वल म्हणून निवडल्या जाणाऱ्या शाळेला पहिले बक्षिस चक्क 50 लाख, दुसरे बक्षिस 21 लाख आणि तिसरे बक्षिस म्हणून 11 लाख रुपये मिळणार आहेत.

Advertisement

.