जि. पं.अधिकारी राहुल शिंदे यांची नंदगड येथे भेट
सामाजिक-शैक्षणिक गणतीचा घेतला आढावा : संगोळ्ळी रायण्णा स्मारकाची पाहणी
खानापूर : जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी रविवारी तालुक्यातील नंदगड येथे भेट दिली. सामाजिक आणि शैक्षणिक सर्वेक्षणाच्या प्रगतीचा आढावा घेतला. तसेच नंदगड येथील रेशन दुकानाला भेट देऊन पाहणी केली आणि धान्य पुरवठ्याबद्दल आणि सर्वेक्षण प्रलंबित असलेल्या कुटुंबांची माहिती घेतली. समाज कल्याण विभागाचे अधिकारी आणि तहसीलदारांना सर्वेक्षण प्रलंबित असलेल्या कुटुंबांची माहिती देऊन सर्वेक्षण तातडीने पूर्ण करण्यात यावे, अशा सूचना केल्या. नंदगड परिसरात अद्याप एक हजार कुटुंबांचे सर्वेक्षण होणे शिल्लक आहे. याबाबत तातडीने योग्य नियोजन करून सर्वेक्षण पूर्ण करून अहवाल संबंधित अधिकाऱ्याकडे सोपवावा, अशा सूचना जिल्हा पंचायतीचे कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी बैठकीत दिला.
रायण्णांच्या स्मारकाला भेट
नंदगड येथील क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा यांच्या फाशीस्थळाच्या ठिकाणी निर्माण करण्यात येत असलेल्या वीरभूमीला राहुल शिंदे यांनी भेट देऊन पाहणी केली. आणि उर्वरित काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. त्यांनतर त्यांनी रायण्णा यांच्या समाधीस्थळाला भेट देवून पाहणी केली. समाधीस्थळाजवळील कमल तलावाच्या विकासकामाबाबत आढावा घेतला. उर्वरित काम तातडीने पूर्ण करण्यात यावे, अशा सूचना शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी संगोळ्ळी रायण्णा प्राधिकरणाचे विकास अधिकारी गंगाधर दिवातर, विविध विभागांचे जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय अधिकारी, ग्रा.पं. अध्यक्ष, सदस्य, कर्मचारी आणि इतर नागरिक उपस्थित होते.