झोमेटोची बल्ले बल्ले, तिमाहीत झाला नफा
2848 कोटीचा मिळवला विक्रमी महसूल : मागच्या वर्षी होती तोट्यात
मुंबई :
फूड डिलिव्हरी क्षेत्रातील कंपनी झोमॅटोने आपला 30 सप्टेंबरअखेरचा तिमाहीचा निकाल जाहीर केला असून 36 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कंपनीने प्राप्त केला आहे. लक्षात घ्या की मागच्या वर्षी याच अवधीत कंपनी तोट्यात होती.
लोकांनी मोठ्या प्रमाणात या तिमाहीमध्ये रेस्टॉरंट व हॉटेलमध्ये खाण्याची ऑर्डर नोंदवली होती. त्यामुळे कंपनीला याचा लाभ उठवता आला आहे. आर्थिक वर्ष 2023 च्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीने 251 कोटी रुपयांचा तोटा सहन केला होता. कंपनीने या खेपेला नफा मिळवत चांगली कामगिरी नोंदवली आहे. आर्थिक वर्ष 2024 च्या पहिल्या तिमाहीत कंपनीने 2 कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त केला होता.
महसूलात केला विक्रम
सप्टेंबर 30 ला संपलेल्या दुसऱ्या तिमाहीमध्ये झोमॅटोने 2848 कोटी रुपयांचा विक्रमी महसूल प्राप्त केला आहे. वर्षाच्या आधारावर पाहता हा महसूल 71 टक्के अधिक असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. तज्ञांनी 2607 कोटीपेक्षा अधिकचा महसूल प्राप्त केला जाईल असा अंदाज वर्तवला होता मात्र हा अंदाजही विक्रमी महसूल वाढीने मागे टाकला आहे. मागच्या वर्षी समान अवधीमध्ये 1661 कोटी रुपयांचा महसूल कंपनीने प्राप्त केला होता. उत्पन्नामध्ये 67 टक्के वाढ झाली असून 3060 कोटी रुपयांचे एकूण उत्पन्न कंपनीने प्राप्त केले आहे. मागच्या वर्षी याच अवधीत 1831 कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त केले होते.