झोमॅटोने प्लॅटफॉर्म शुल्कात केली वाढ
दिवसाला 22 ते 25 लाख ऑर्डरची पुर्तता
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
फूड डिलीव्हरी क्षेत्रातल्या कंपन्या स्विगी आणि झोमॅटो यांनी आपली प्लॅटफॉर्म फी वाढवली असून यापुढे आता ग्राहकांना प्रति ऑर्डर 6 रुपये अतिरीक्त मोजावे लागणार आहेत. याआधी हे शुल्क 5 रुपये इतके होते. याचाच अर्थ शुल्कामध्ये उभय कंपन्यांनी 20 टक्क्यांची वाढ केल्याचे स्पष्ट होत आहे.
सुरुवातीला हे शुल्क बेंगळूर आणि दिल्ली या शहरात तात्काळ लागू केले जाणार आहे. हे शुल्क सर्व प्रकारच्या स्विगी, झोमॅटोच्या ऑर्डरवर असल्याचेही कंपनीने स्पष्ट केलेले आहे. तसं पाहिल्यास ऑर्डरवर प्रत्येकी 1 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. झोमॅटो दरदिवशी 22 लाख ते 25 लाख खाद्य पदार्थांच्या ऑर्डर्सची डिलीव्हरी करते. यातून कंपनी दिवसाला 22 ते 25 लाखाचे उत्पन्न मिळवते.
कधीपासून शुल्क आकारणी
स्विगीने एप्रिल 2023 मध्ये प्लॅटफॉर्म शुल्क 2 रुपये आकारले होते त्यापाठोपाठ झोमॅटोनेही ऑगस्टमध्ये लागू केले. असे करुनही कंपनीच्या ऑर्डरमध्ये कोणतीही घट दिसलेली नाही. याचाच अर्थ ग्राहक शुल्क भरायला तयार आहेत, असा होतो. त्यामुळे दोन्ही कंपन्यांनी पुन्हा शुल्क वाढवत 6 रुपयांवर नेले आहे. याचदरम्यान सोमवारी झोमॅटोचे समभाग 2.99 टक्के किंवा 6.66 रुपयांनी वाढत 229 रुपयांवर इंट्रा डे दरम्यान पोहचले होते.