झोमॅटोने सणासुदीत प्लॅटफॉर्म शुल्क 3 रुपयांनी वाढविले
फी 7 रुपयांवरुन 10 रुपये : समभाग 2 टक्क्यांपेक्षा अधिक वाढले
नवी दिल्ली :
फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोने सणासुदीच्या काळात प्लॅटफॉर्म फी 7 रुपयांवरून 10 रुपये केली आहे. कंपनीने अॅप नोटिफिकेशनमध्ये ही माहिती दिली आहे. कंपनीने 23 ऑक्टोबर रोजी एका अॅप नोटिफिकेशनमध्ये सांगितले की, ‘हे शुल्क आम्हाला झोमॅटो चालू ठेवण्यासाठी आमची बिले भरण्यास मदत करेल. सणासुदीच्या काळात सेवा सुरू ठेवण्यासाठी त्यात किंचित वाढ करण्यात आली आहे.
झोमॅटोने प्लॅटफॉर्म फी 2 रुपयांपासून सुरू
ऑगस्ट 2023 मध्ये, झोमॅटोने त्याचे मार्जिन वाढवण्यासाठी आणि फायदेशीर होण्यासाठी 2 रुपये प्लॅटफॉर्म फी सुरू केली. कंपनीने नंतर ते 3 रुपये आणि 1 जानेवारीला 4 रुपये केले. नंतर हळूहळू ते 7 रुपये करण्यात आले.
प्लॅटफॉर्म फी हे प्रत्येक फूड ऑर्डरवर लागू केलेले अतिरिक्त शुल्क आहे. हे जीएसटी, रेस्टॉरंट शुल्क आणि वितरण शुल्कापासून वेगळे आहे. हे प्लॅटफॉर्म दररोज 20 ते 25 लाख खाद्य पदार्थांची ऑर्डर वितरित करते.
झोमॅटोचे समभाग 2 टक्क्यांनी वाढले
प्लॅटफॉर्म फीमध्ये वाढ झाल्याच्या बातम्यांनंतर बुधवारी झोमॅटोचे शेअर्स सुमारे 2 टक्क्यांनी वाढले आहेत. ते रु. 262 च्या आसपास ट्रेडिंग करत आहेत. एका वर्षात कंपनीच्या शेअर्सने 140 टक्के परतावा दिला आहे. त्याचवेळी, हा समभाग दुप्पट झाला आहे.
नफ्यात 388 टक्के वाढ
फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोचा जुलै-सप्टेंबर तिमाहीत नफा वार्षिक 388 टक्क्यांनी वाढून 176 कोटी रुपये झाला आहे. वर्षभरापूर्वी याच तिमाहीत कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा 36 कोटी रुपये होता. झोमॅटोने 22 ऑक्टोबर रोजी आर्थिक वर्ष 2024-25 च्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले.