वनडे सामन्यात झिम्बाब्वेचा पाकला धक्का
सामनावीर सिकंदर रझा : 39 धावा व 7 धावांत 2 बळी
वृत्तसंस्था / बुलावायो
पाकिस्तानचा क्रिकेट संघ सध्या झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर वनडे मालिका खेळत आहे. या मालिकेतील येथे झालेल्या पहिल्या सामन्यात यजमान झिम्बाब्वेने डकवर्थ लेव्हिस नियमाच्या आधारे पाकचा 80 धावांनी पराभव करत विजयी सलामी दिली.
पाकच्या वनडे संघाने अलिकडेच ऑस्ट्रेलियाच्या भूमित ऑस्ट्रेलिया विरुद्ध तब्बल 22 वर्षांनंतर पहिली वनडे मालिका जिंकली होती. पण पाक संघाला ही विजयी परंपरा झिम्बाब्वे विरुद्ध राखता आली नाही. या पहिल्या सामन्यात पाकने नाणेफेक जिंकून झिम्बाब्वेला प्रथम फलंदाजी दिली. गुंबले आणि मेरुमणी या सलामीच्या जोडीने झिम्बाब्वेच्या डावाला बऱ्यापैकी सुरूवात करुन देताना 40 धावांची भागिदारी केली.पाकच्या आगा सलमानने गुंबलेला शफीककरवी 15 धावांवर बाद केले. आगा सलमानने यानंतर झिम्बाब्वेचे तीन गडी लवकरच बाद केल्याने झिम्बाब्वेची स्थिती 4 बाद 83 अशी झाली होती. सिन विलियम्सने 23, सिकंदर रझाने 39 आणि बेनेटने 20 धावा जमविल्या. रिचर्ड निगेरेव्हाने 48 धावांचे योगदान दिल्याने झिम्बाब्वेने 205 धावांपर्यंत मजल मारली.
प्रत्युत्तरादाखल खेळताना पाकच्या डावामध्ये पहिल्या पाच षटकात सईम आयुब आणि शफीक या सलामीच्या जोडीने सावध फलंदाजी केली. झिम्बाब्वेच्या मुझारबनने आयुबला 11 धावांवर तर शफीकला एका धावेवर बाद केले. सिन विलियम्सने कमरान गुलामला 17 धावांवर मेरुमणीकरवी झेलबाद केले. झिम्बाब्वेचा अनुभवी फिरकी गोलंदाज सिकंदर रझाने आगा सलमानला आणि त्यानंतर वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या पाकच्या हसीबुल खानला बाद केले. पाकची स्थिती यावेळी 5 बाद 49 अशी केविलवानी झाली. मात्र एका बाजुने कर्णधार मोहम्मद रिझवानने चिवट फलंदाजी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. तर विलियम्सने इरफान खानचा त्रिफळा उडविला. पाकची स्थिती 6 बाद 60 अशी असताना पावसाला प्रारंभ झाला. पंचांनी पाऊस थांबण्यासाठी वाट पाहिली. पण खेळपट्टी ओलसर असल्याने पुढे खेळ होऊ शकला नाही आणि पंचांनी झिम्बाब्वेला डकवर्थ लेव्हिस नियमाच्या आधारे 80 धावांनी विजय म्हणून घोषित केले.
संक्षिप्त धालफलक: झिम्बाब्वे 50 षटकात 205 (गुंबले 15, सिन विलियम्स 23, सिकंदर रझा 39, बेनेट 20, निगेरेव्हा 48), पाक 6 बाद 60 (सईम आयुब 11, शफीक 1, कमरान गुलाम 17)