For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विनेश फोगाट पुन्हा कुस्तीच्या आखाड्यात

06:55 AM Dec 13, 2025 IST | Tarun Bharat Portal
विनेश फोगाट पुन्हा कुस्तीच्या आखाड्यात
Advertisement

वृत्तसंस्था/ चंदीगड, नवी दिल्ली

Advertisement

भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगाटने आपल्या निवृत्तीच्या निर्णयावर यू-टर्न घेत पुन्हा एकदा कुस्तीच्या आखाड्यात उतरणार असल्याची घोषणा केली आहे. यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली आहे. लॉस एंजेल्स ऑलिम्पिक हेच तिचे नवे लक्ष्य असल्याचे विनेशने जाहीर केले असून लवकरच ट्रेनिंगला सुरूवात करणार आहे.

पॅरिस ऑलिम्पिकवेळी तिने निवृत्तीची घोषणा केली होती. त्यावेळी अवघे 50 ग्रॅम वजन जास्त भरल्याने तिला फायनलमधून बाद करण्यात आले होते. विशेष म्हणजे, फायनल गाठणार पहिली महिला भारतीय कुस्तीपटू ठरली होती. मात्र आता मागे झालेले सर्व काही विसरत तिने पुन्हा एकदा कुस्तीच्या आखाड्यात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

Advertisement

सोशल मीडियावर पोस्ट करत निवृत्तीचा निर्णय घेतला मागे

विनेशने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने लिहिले की, ‘लोकं मला पॅरिस ऑलिम्पिकनंतर हा माझा शेवट असेल का? असे विचारत होते. मी बराच काळ या प्रश्नाचे उत्तर दिले नव्हते. मला मॅटपासून, अपेक्षांपासून, दबावापासून काही काळ दूर राहण्याची गरज होती. माझ्या प्रवासात काय अडथळे आहेत, हे समजून घेण्यासाठी मला वेळ लागला.  कितीही दूर गेले तरी माझा एक भाग नेहमी मॅटवरच असतो. अर्थात, कुस्तीबद्दलची आवड कधीच कमी झाली नाही. कुस्ती हा केवळ खेळ नाही, तो माझा श्वास आहे, त्यामुळे मला अजूनही स्पर्धा करायची आहे, असे तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

लॉस एंजेल्स ऑलिम्पिक हेच लक्ष्य

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जे काही झाले ते मी विसरुन गेले आहे. आता, 2028 लॉस एंजेल्स ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याचा माझा प्रयत्न असेल. या प्रवासात मी आता एकटी नसून माझा छोटा मुलगाही माझ्यासोबत आहे. लॉस एंजेल्स ऑलिम्पिकच्या प्रवासात छोटा चिअरलीडर माझी सर्वात मोठी प्रेरणा असल्याचे तिने आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.

दरम्यान, पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये अपात्र ठरल्यानंतर विनेशने कोर्ट ऑफ ऑर्बिट्रेशनमध्ये अपील केले होते. यासाठी एक समितीही स्थापन झाली होती, पण सुनावणीला उशीर झाल्याने तिचे अपील फेटाळण्यात आले. विनेशने तीन वेळा ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला, पण तिला पदक जिंकता आले नाही. आता 2028 हेच तिचे सर्वोच्च ध्येय आहे.

Advertisement
Tags :

.