झिम्बाब्वेला विजयासाठी 186 धावांची गरज
रेहमत शहा, इस्मत आलम यांची शतके, मुझारबनीचे 6 बळी
वृत्तसंस्था/ बुलावायो
दुसऱ्या आणि शेवटच्या क्रिकेट कसोटीत रविवारी खेळाच्या चौथ्या दिवशी चहापानावेळी यजमान झिम्बाब्वेला विजयासाठी 186 धावांची गरज असून त्यांचे 7 गडी खेळावयाचे आहेत. चहापानावेळी झिम्बाब्वेने दुसऱ्या डावात 3 बाद 92 धावा जमविल्या होत्या. या कसोटीत अफगाणने झिम्बाब्वेला निर्णायक विजयासाठी 278 धावांचे आव्हान दिले होते.
या कसोटीमध्ये अफगाणने पहिल्या डावात 157 धावा जमविल्यानंतर झिम्बाब्वेचा पहिला डाव 243 धावात आटोपला. झिम्बाब्वेने पहिल्या डावात अफगाणवर 86 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. त्यानंतर अफगाणचा दुसरा डाव 363 धावांवर समाप्त झाला. झिम्बाब्वेला विजयासाठी 278 धावांचे आव्हान मिळाले. चहापानापर्यंत रविवारी खेळाच्या चौथ्या दिवशी झिम्बाब्वेने दुसऱ्या डावात 3 बाद 92 धावा जमविल्या होत्या.
अफगाणने 7 बाद 291 या धावसंख्येवरुन चौथ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला. आणि त्यांचा दुसरा डाव 113.5 षटकात 363 धावांवर आटोपला. अफगाणच्या दुसऱ्या डावात रेहमत शहा आणि इस्मत आलम यांनी दमदार शतके झळकाविली. शहाने 275 चेंडूत 14 चौकारांसह 139 तर इस्मत आलमने 181 चेंडूत 9 चौकारांसह 101 धावा जमविल्या. रशित खानने 3 चौकारांसह 23 धावा केल्या. झिम्बाब्वेच्या मुझारबनीने 95 धावांत 6 तर निगरेव्हाने 76 धावांत 3 तर सिकंदर रझाने 79 धावांत 1 गडी बाद केला. उपहारावेळी अफगाणचा दुसरा डाव संपुष्टात आला.
झिम्बाब्वेने उपहारानंतरच्या दुसऱ्या सत्रात 31 षटकात 3 बाद 92 धावांपर्यंत मजल मारली होती. बेन करेनने 53 चेंडूत 5 चौकारांसह 38, गुंबीने 2 चौकारांसह 15 आणि कैतानोने 1 षटकार आणि 2 चौकारांसह 21 धावा जमविल्या. सिकंदर रझा 15 तर मेयर्स एका धावेवर खेळत आहे. अफगाणतर्फे रशिद खानने 2 तर झिया ऊर रेहमानने 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक - अफगाण प. डाव 44.3 षटकात सर्वबाद 157, झिम्बाब्वे प. डाव 73.3 षटकात सर्वबाद 243, अफगाण दु. डाव 113.5 षटकात सर्वबाद 363 (रेहमत शहा 139, इस्मत आलम 101, रशिद खान 23, अवांतर 21, मुझारबनी 6-95, निगरेव्हा 3-76, सिकंदर रझा 1-79), झिम्बाब्वे दु. डाव 31 षटकात 3 बाद 92 (गुंबी 15, बेन करेन 38, कैतानो 21, सिकंदर रझा खेळत आहे 15, रशिद खान 2-23, झिया ऊर रेहमान 1-20).