ऑस्ट्रेलियाचे कमबॅक, इंग्लंड बॅकफूटवर
वृत्तसंस्था/ ब्रिस्बेन
अॅशेस मालिकेतील दुसऱ्या डे-नाईट कसोटीत यजमान ऑस्ट्रेलियाने चिवट खेळ करत इंग्लंडला बॅकफूटवर ढकलले आहे. इंग्लंडचा पहिला डाव 334 धावांत आटोपल्यानंतर कांगारुंनी दुसऱ्या दिवशी 6 बाद 378 धावा जमवल्या आहेत. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑसी संघाकडे 44 धावांची आघाडी असून अॅलेक्स केरी 46 तर मायकेल नीसर 15 धावांवर खेळत होते.
प्रारंभी, पहिल्या दिवशी इंग्लंडने 9 गडी गमवून 325 धावा केल्या होत्या. याच धावसंख्येवरुन दुसऱ्या दिवशी इंग्लिश संघाने खेळायला सुरुवात केली पण यात आणखी 9 धावांची भर पडली आणि शेवटची विकेट पडली. जो रूट 138 धावांवर नाबाद राहिला. तर जोफ्रा आर्चर 38 धावा करून बाद झाला. इंग्लंडने पहिल्या डावात 334 धावा केल्या.
ऑस्ट्रेलियाला 44 धावांची आघाडी
इंग्लंडचा पहिला डाव 334 धावांत आटोपल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ फलंदाजी आला. ऑस्ट्रेलियाने सावध सुरुवात केली आणि दुसऱ्याच दिवशीच 334 धावांचे आव्हान गाठून पुढे गेले. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑसी संघाने 6 गडी गमवून 378 धावा केल्या. यासह ऑस्ट्रेलियाने 44 धावांची आघाडी घेतली असून यात तिसऱ्या दिवशी आणखी भर पडेल यात काही शंका नाही. दरम्यान, ट्रॅव्हिस हेड आणि जेक वेदराल्ड ही जोडी मैदानात उतरली. पहिल्या विकेटसाठी या जोडीने 77 धावांची भागीदारी केली. ट्रेव्हिस हेड 33 धावा करून बाद झाला. त्यानंतर वेदराल्ड आणि मार्नस लाबुशेन यांची जोडी जमली. या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी 69 धावांची भागीदारी केली आणि संघाचे शतक फलकावर लावले. यादरम्यान जेकने शानदार अर्धशतकी खेळी साकारताना 78 चेंडूत 12 चौकार आणि 1 षटकारासह 72 धावा केल्या. अर्धशतकानंतर मात्र त्याला आर्चरने तंबूचा रस्ता दाखवला. लाबुशेनही 78 चेंडूत 9 चौकार आणि 1 षटकारासह 65 धावा फटकावल्या.
स्मिथचे अर्धशतक
लाबुशेन बाद झाल्यानंतर स्टीव्हन स्मिथ मैदानात उतरला. त्यानेही अपेक्षित धावा केल्या. स्मिथने 85 चेंडूंचा सामना केला आणि 61 धावांचे योगदान दिले तर कॅमरुन ग्रीनने 7 चौकारासह 45 धावा केल्या. याशिवाय, जोश इंग्लिसने 23 धावा केल्या. ही जोडी बाद झाल्यानंतर अॅलेक्स केरी आणि मायकेल नीसर यांनी आणखी विकेट पडू दिली नाही. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाने 73 षटकांत 6 बाद 378 धावा केल्या होत्या. केरी 5 चौकारासह 46 तर नीसर 15 धावांवर खेळत होता. इंग्लंडकडून ब्रायडन कार्सने सर्वाधिक 3 गडी बाद केले, तर बेन स्टोक्सने 2 आणि जोफ्रा आर्चरला एक विकेट मिळाली.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड पहिला डाव 334,
ऑस्ट्रेलिया पहिला डाव 73 षटकांत 6 बाद 378 (टॅव्हिस हेड 33, वेदराल्ड 72, लाबुशेन 65, स्टीव्हन स्मिथ 61, कॅमरुन ग्रीन 45, अॅलेक्स केरी खेळत आहे 46, जोस इंग्लिस 23, नीसर खेळत आहे 15, कार्स 3 बळी, बेन स्टोक्स 2 बळी, आर्चर 1 बळी).
लाबुशेनचा विक्रमी कारनामा
लाबुशेनने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीत 61 धावांची खेळी साकारली. या खेळीसह आणखी एक विक्रम त्याने आपल्या नावे केला. लाबुशेन हा डे-नाईट कसोटी सामन्यांमध्ये 1000 धावांचा पल्ला गाठणारा पहिलाच फलंदाज ठरला आहे. आतापर्यंत त्याने 16 डावात 63.93 च्या सरासरीने फलंदाजी करताना 1023 धावा केल्या आहेत. पिंक बॉल कसोटीत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत स्टीव्ह स्मिथ दुसऱ्या स्थानी आहे. स्मिथदेखील 1000 धावा करण्याच्या जवळ पोहोचला आहे.