झिम्बाब्वेचा लंकेवर 67 धावांची विजय
वृत्तसंस्था / रावळपिंडी
तिरंगी टी-20 मालिकेतील येथे खेळविण्यात आलेल्या सलामीच्या सामन्यात कर्णधार सिकंदर रझा आणि वेगवान गोलंदाज ब्रॅड इव्हान्स यांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर झिम्बाब्वेने लंकेचा 67 धावांनी पराभव केला. झिम्बाब्वेचा लंकेवरील हा सर्वात मोठा विजय म्हणावा लागेल. लंकेने नाणेफेक जिंकून झिम्बाब्वेला प्रथम फलंदाजी दिली. झिम्बाब्वेने 20 षटकात 8 बाद 162 धावा जमविल्या. त्यानंतर लंकेचा डाव शेवटच्या चेंडूवर 95 धावांवर आटोपला.
झिम्बाब्वेच्या डावामध्ये सिकंदर रझाने 32 चेंडूत 47 धावा झोडपल्या तर सलामीचा फलंदाज ब्रायन बेनेटने 49 धावांचे योगदान दिले. बेनेटचे अर्धशतक केवळ 1 धावाने हुकले. पाकच्या दौऱ्यावर गेलेल्या लंकन संघाची कामगिरी यापूर्वी झालेल्या पाकविरुद्धच्या वनडे मालिकेत अत्यंत निकृष्ट झाली. पाकने वनडे मालिकेत लंकेचा 3-0 असा एकतर्फी पराभव केला. गुरूवारी या मालिकेतील झालेल्या पहिल्या सामन्यात पाककडून झिम्बाब्वेला पराभव पत्करावा लागला होता. पण त्यानंतर लंकेविरुद्धच्या सामन्यात बेनेट आणि कर्णधार सिकंदर रझा यांनी कडवी लढत दिली. बेनेटने आपल्या फलंदाजीला दमदार सुरूवात केली. डावातील दुसऱ्याच षटकात बेनेटने 3 चौकार ठोकले तर सिकंदर रझा समवेत त्याने 61 धावांची भागिदारी केली. झिम्बाब्वेच्या फलंदाजांनी शेवटच्या पाच षटकात 46 धावा झोडपल्या. आता या तिरंगी टी-20 मालिकेतील लंकेचा सामना पाकबरोबर होत आहे.
प्रत्युत्तरादाखल खेळताना झिम्बाब्वेच्या ब्रॅड इव्हान्सने 9 धावांत 3 गडी बाद केले. तर झिम्बाब्वेच्या 6 गोलंदाजांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. सलामीचा फलंदाज निशांका खाते उघडण्यापूर्वीच बाद झाला तर त्यानंतर मापोसाच्या गोलंदाजीवर कुशल परेरा झेलबाद झाला. लंकेची यावेळी स्थिती पॉवरप्ले दरम्यान 2 बाद 25 अशी होती. कर्णधार डी. शनाकाने 34 धावांचे योगदान दिले. लंकेच्या डावामध्ये केवळ दोन फलंदाजांनी दुहेरी धावसंख्या गाठली. 20 षटकातच लंकेचा डाव 95 धावांवर आटोपला.
संक्षिप्त धावफलक: झिम्बाब्वे 20 षटकात 8 बाद 162 (सिकंदर रझा 47, बेनेट 49), लंका 20 षटकात सर्वबाद 95 (डी. शनाका 34, इव्हान्स 3-9)