पशुसंगोपन विभागाच्या कामकाजाचा जि. पं. सीईओंकडून आढावा
बेळगाव : जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी गोकाक तालुक्यातील काही पशुचिकित्सालयांना भेटी देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. अंकलगी (ता. गोकाक) येथील पशुचिकित्सालयात असलेला औषधसाठा, लस व कृत्रिम गर्भधारणेसंबंधीच्या नोंदी पडताळल्या. कुंदरगी ग्रा. पं.च्या कार्यक्षेत्रातील गोडचिनमलकी येथे पशुपालन व पशुवैद्यकीय सेवा विभागाच्यावतीने एनएलएमईडीपी योजनेंतर्गत उभारण्यात आलेल्या शेळीपालन शेडची पाहणी केली. या शेडमध्ये 496 शेळी आहेत. या योजनेचे लाभार्थी महम्मद शरीफ, मुक्तुसाब पाटील यांनी शेळीपालन, यासाठी लागणारा खर्च, या व्यवसायातून येणारे उत्पन्न आदींविषयी माहिती दिली.
त्यानंतर गोकाक येथील पशुपालन व पशुवैद्यकीय सेवा खात्याच्या सभागृहात मुडलगी तालुक्यातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेण्यात आला. जनावरांच्या गणतीसाठी आवश्यक पावले उचलण्याची सूचना अधिकाऱ्यांना करण्यात आली. यावेळी गोकाक ता. पं. चे कार्यकारी अधिकारी परशुराम गस्ती यांना 33 ग्रा. पं.च्या कार्यक्षेत्रात मनरेगा योजनेतून उभारण्यात येणारे जनावरे व बकऱ्यांची शेड तयार करून अभियानाच्या धर्तीवर लाभार्थींची निवड करण्याची सूचना केली.यावेळी पशुपालन व वैद्यकीय सेवा विभागाचे डॉ. राजीव कुलेर, तहसीलदार मोहन भस्मे, साहाय्यक कार्यकारी अभियंते उदयकुमार कांबळे,साहाय्यक संचालक विनय कुमार यांच्यासह गोकाक व मुडलगी तालुक्यातील अधिकारी उपस्थित होते. आपल्या या दौऱ्यात राहुल शिंदे यांनी पशुपालन व वैद्यकीय सेवा विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला.