सीमावासियांचा आज ‘काळादिन’
सायकल फेरीतून अन्यायाविरुद्ध फोडली जाणार वाचा : सीमावासियांना सहभागी होण्याचे आवाहन
बेळगाव: भाषावार प्रांतरचनेनंतर बेळगावसह सीमाभागावर झालेल्या अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी शुक्रवार दि. 1 नोव्हेंबर रोजी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली मूक सायकल फेरी काढून केंद्र सरकारचा निषेध केला जाणार आहे. सकाळी 9 वाजता धर्मवीर संभाजी उद्यानातून सायकल फेरीला सुरुवात होणार आहे. बेळगाव, खानापूर, निपाणीसह संपूर्ण सीमाभागात 1 नोव्हेंबर रोजी हरताळ पाळला जातो. यावर्षी दिवाळी असली तरी मोठ्या संख्येने सीमावासियांनी उपस्थित राहून सीमाप्रश्नाविषयीची आस्था दाखवून द्यावी असे आवाहन म. ए. समितीने केले आहे.
1956 रोजी केंद्र सरकारने भाषावार प्रांतरचना करून बेळगाव, खानापूर, निपाणी, कारवार या परिसरातील मराठी बहुल भाग तत्कालिन म्हैसूर प्रांताला जोडला. केंद्र सरकारच्या एका चुकीमुळे मागील 68 वर्षांपासून बेळगावमधील मराठी भाषिक कर्नाटकात खितपत पडला आहे. केंद्र सरकारचा या कृतीचा निषेध करण्यासाठी प्रतिवर्षी 1 नोव्हेंबर रोजी बेळगावमधील नागरिक काळ्या रंगाचे कपडे, ध्वज, काळ्या टोप्या घालून सायकल फेरी काढून निषेध व्यक्त करतात. शुक्रवारी सकाळी 9 वाजता धर्मवीर संभाजी उद्यानातून सायकल फेरीला सुरुवात होईल. बेळगाव, शहापूर येथील प्रमुख गल्ल्यांमधून मूक सायकल फेरी काढली जाणार असून गोवावेस मार्गे मराठा मंदिर येथे सभा होणार आहे. सभेसाठी महाराष्ट्रातील सर्व पक्षीयांना निमंत्रण मध्यवर्ती म. ए. समितीने पाठविले असून कोणते नेते उपस्थित राहणार हे औत्सुक्याचे ठरणार आहे.
सायकल फेरीला परवानगी मिळो अथवा न मिळो परंतु काळा दिन यशस्वी करणारच असा निर्धार सर्व घटक समितींच्या बैठक्यांमध्ये करण्यात आला होता. शहराच्या उपनगरांसोबतच गावागावांमध्ये म. ए. समितीने जागृती केली. सायकल फेरीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन शहर म. ए. समिती, तालुका म. ए. समिती, महिला आघाडी, युवा समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
सीमाभागात आज कडकडीत हरताळ
अन्यायाविरुद्ध निषेध व्यक्त करण्यासाठी प्रतिवर्षी 1 नोव्हेंबर रोजी कडकडीत हरताळ पाळला जातो. मराठी भाषिक आपले व्यवसाय, उद्योग बंद ठेवून निषेध व्यक्त करतात. यावर्षी लक्ष्मी पूजन असल्याने सकाळच्या सत्रात उद्योग, व्यवसाय बंद ठेवले जाणार असून सायंकाळनंतर ते सुरू केले जाणार आहेत. यावर्षी केवळ बेळगावच नाही तर कोल्हापूर, सांगली, पुणे येथेही निषेध व्यक्त केला जाणार आहे.
आज आकाश कंदील, पणत्याविना दिवाळी
यावर्षी काळ्यादिनी दिवाळी आली आहे. गुरुवारपासून दिवाळीला प्रारंभ झाल्याने प्रत्येक घरासमोर आकाश कंदील, पणत्या लावण्यात आल्या आहेत. परंतु शुक्रवारी बेळगावमध्ये आकाश कंदील व पणत्या पेटविल्या जाणार नाहीत. सीमावासियांवर झालेल्या अन्यायाची इतरांनीही दखल घ्यावी यासाठी आकाश कंदील व पणत्या पेटवू नयेत, तसेच विद्युत रोषणाई करू नये, मूक सायकल फेरीत कोणीही घोषणा देऊ नये, असे आवाहन म. ए. समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
पोलीस आयुक्तांसोबत र्च्च्चा
काळ्यादिनाच्या सायकल फेरीबाबत गुरुवारी म. ए. समितीच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांची भेट घेतली. सीमालढा कर्नाटक सरकारविरुद्ध नसून तो केंद्र सरकारविरुद्ध आहे. यापूर्वी कधीही कन्नड-मराठी असा वाद निर्माण झाला नव्हता. बेळगावमध्ये काही बाहेरील कानडी संघटनांचे लोक विनाकारण पोलीस आणि प्रशासनावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतात. त्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर प्रतिवर्षाप्रमाणे मूक सायकल फेरी शांततेत काढली जाईल, असे पोलीस आयुक्तांना सांगण्यात आले. यावेळी पोलीस उपायुक्त रोहन जगदीश, मध्यवर्ती म. ए. समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, रणजित चव्हाण-पाटील, नेताजी जाधव, नगरसेवक रवी साळुंखे, माजी महापौर संजय शिंदे, भरत नागरोळी, उमेश काळे यांचा शिष्टमंडळात समावेश होता.