झेंगचा साबालेन्काला धक्का, अल्कारेझ उपांत्य फेरीत
वृत्तसंस्था/रोम
झेंग किनवेनने अग्रमानांकित एरीना साबालेन्कावर पहिला विजय मिळविताना येथे सुरू असलेल्या इटालियन ओपन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत तिला हरविले. उपांत्य फेरीत तिची लढत अमेरिकेच्या कोको गॉफशी होणार आहे. 22 वर्षीय चीनच्या झेंगने साबालेन्कावर 6-4, 6-3 अशी मात केली. झेंग ही ऑलिम्पिक चॅम्पियन आहे. यापूर्वी सहा वेळा तिला साबालेन्काकडून हार पत्करावी लागली होती. आठव्या मानांकित झेंगने सर्व पाचही ब्रेकपाईंट्स वाचवले आणि साबालेन्काची सर्व्हिस तीनदा भेदली. 25 मे पासून सुरू होणाऱ्या प्रेंच ओपन स्पर्धेआधी ही शेवटची सरावाची स्पर्धा आहे.
पुरुष एकेरीत अल्कारेझने जॅक ड्रेपरचा 6-4, 6-4 असा पराभव करीत उपांत्य फेरी गाठली. त्याने आठपैकी सहा ब्रेकपॉईंट्स वाचवले. त्याला येथे तिसरे मानांकन मिळाले आहे. त्याची उपांत्य लढत लॉरेन्झो मुसेटीशी होईल. मुसेटीने विद्यमान विजेत्या अलेक्झांडर व्हेरेव्हचे आव्हान 7-6 (7-1), 6-4 असे संपुष्टात आणले. कोको गॉफने मायरा अँड्रीव्हाविरुद्धची विजयी मालिका पुढे चालू ठेवताना तिच्यावर 6-4, 7-6 (7-5) अशी मात केली. गॉफचा तिच्यावरील हा चौथा विजय आहे. जस्मिन पाओलिनी व पेटन स्टीयर्न्स यांच्यात दुसरी उपांत्य लढत होणार आहे.