For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

झिरो पेंडन्सीसह आरोपी दत्तक योजना राबविणार

11:18 AM Jan 01, 2025 IST | Radhika Patil
झिरो पेंडन्सीसह आरोपी दत्तक योजना राबविणार
Zero pendency accused adoption scheme to be implemented
Advertisement

कोल्हापूर / कृष्णात चौगले : 

Advertisement

कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाच्यावतीने आगामी 2025 या वर्षामध्ये नागरिकांशी असलेले संबंध दृढ व्हावेत व नागरिकांच्या तक्रारींचे समाधानकारक निराकरण व्हावे यासाठी झिरो पेंडन्सीसह जिह्यातील पोलीस अभिलेखावरील गुन्हेगारांची यादी तयार करुन 1 जानेवारी 2025 पासून ‘आरोपी दत्तक योजना’ राबविली जाणार आहे. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या नेतृत्वाखाली पुढील वर्षभरात हे दोन्ही उपक्रम प्रभावीपणे राबविले जाणार आहेत.

झिरो पेंडन्सी योजनेअंतर्गत नागरिकांच्यावतीने त्यांच्या वेगवेगळ्या तक्रारींच्या संदर्भाने पोलीस ठाण्याकडे तसेच वरिष्ठ पातळीवर प्राप्त होणाऱ्या तक्रारी व अर्जांची एक महिन्यात परिणामकारक निपटारा करण्यासाठी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी कोल्हापूर जिह्यातील पोलीस ठाणे प्रभारी, शाखा प्रमुखांसह, उपविभागीय पोलीस अधिकारी व अपर पोलीस अधीक्षकांना सूचना दिल्या आहेत. त्यानुसार झीरो पेंडन्सीचे लक्ष्य सर्व जिल्हा पोलीस दलास निश्चित करुन दिले आहे. सुरवातीला किरकोळ स्वरुपाच्या वादामध्ये वेळीच हस्तक्षेप न केल्यास त्यास गंभीर स्वरुप प्राप्त होवून त्यातून पुढे गंभीर गुन्हे व कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होतात. यावर परिणामकारक प्रतिबंध व्हावा व शुल्लक गोष्टींचे रुपांतर मोठ्या वादात होवू नये यासाठी सदरची योजना अंमलात आणलेली आहे.

Advertisement

                           गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी ‘आरोपी दत्तक योजना’

नवीन वर्षामध्ये कोल्हापूर जिल्हा व परिसरातील शरिराविरुध्दच्या गुह्यांसह मालाविरुद्धच्या गुह्यांना परिणामकारक आळा घातला जावा, यासाठी पोलीस अधीक्षकांनी आरोपी दत्तक योजनेची सुरवात केली आहे. आरोपी दत्तक योजनेअंतर्गत कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाच्या अभिलेखावरील हिस्ट्रीशिटर, गैंग हिस्ट्रीशिटर, माहितगार गुन्हेगार, गंभीर गुह्यातील आरोपी यांची यादी तयार करून ती सर्व पोलीस ठाण्यांसह विशेष शाखेकडे यांना वितरीत करण्यात येणार आहे.

                                आरोपींच्या संख्येनुसार पथक केले जाणार निश्चित

या योजनेअंतर्गत आरोपींच्या संख्येनुसार 1 पोलीस अधिकारी, 1 अंमलदार यांचे पथक निश्चित करुन त्यांना त्या प्रमाणे आरोपी दत्तक देण्यात येणार आहेत. आरोपींना देखील घटनेने काही मुलभुत अधिकार प्रदान केलेले आहेत. या अधिकारांची जाणीव त्याच्यामध्ये निर्माण व्हावी व त्याने गुन्हेगारी प्रवृत्तीचा त्याग करुन कायद्याला माननाऱ्या सर्वसामान्यांच्या मूळ प्रवाहात सामिल व्हावे यासाठी या योजनेअंतर्गत परिणामकारक प्रयत्न करण्यात येणार आहेत.

                            दत्तक आरोपींची 15 दिवसांतून एकदा घेतली जाणार भेट

आरोपी दत्तक योजनेअंतर्गत दत्तक घेण्यात येणाऱ्या आरोपींना 15 दिवसातून किमान एकदा भेट देवून त्यांच्या हालचालीबाबतची अद्ययावत माहिती घेणे, त्यांचे वर्तमान छायाचित्रे, त्यांचे नातेवाईक, मित्र मंडळी यांची माहिती घेणे, विचारपूस करणे, त्यांच्या कौटुंबिक समस्या यांची माहिती घेवून त्या अभिलेखावर अद्ययावत करणे, तसेच गुन्हेगारीचा त्याग करुन मूळ प्रवाहात सामिल व्हावे यासाठी ही माहिती उपयोगात आणून समाजातील सुशिक्षीत बेरोजगार युवकांसह जे तरुण गुन्हेगारीकडे आकृष्ट होत आहेत त्यांना त्यापासून परावृत्त करणे हा या योजनेचा मूळ उद्देश आहे. अशा प्रकारे कोल्हापूर जिल्हा व परिसरात भयमुक्त समाजाची निर्मिती व्हावी पोलीस व सर्वसामान्य जनता यांचे संबंध दृढ व्हावेत यासाठी आगामी वर्षात दोन उपक्रम प्राधान्याने राबविले जाणार आहेत.

                   तक्रारींच्या त्वरीत निपटाऱ्यासह गुन्हेगारीला आळा घालण्याचे ‘लक्ष्य’

पोलीस दलाकडे नागरीकांकडून विविध प्रकारच्या अनेक तक्रारी प्राप्त होत असतात. यामध्ये विशेषत: फसवणुकीच्या तक्रारींचा निपटारा करताना अनेक पातळींवर पडताळणी करावी लागत असल्यामुळे जास्त कालावधी लागण्याची शक्यता असते. पण यापुढे अशा तक्रारी फार काळ प्रलंबित न ठेवता 15 दिवसांत त्याबाबत निर्णय व्हावा या दृष्टीकोनातून ‘झिरो पेंडन्सी’ हा उपक्रम हाती घेतला आहे. तसेच सर्व पोलीस ठाण्यांतील गुन्हेगारांची यादी तयार करून ती पोलीस ठाण्यांसह विशेष शाखेकडे वितरीत करण्यात येणार आहे. यामध्ये आरोपींना पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना दत्तक दिले जाणार आहे. 15 दिवसातून किमान एकदा भेट देवून त्यांच्या हालचालीबाबतची अद्ययावत माहिती घेतली जाणार आहे. एखादा आरोपी गुन्हेगारीपासून परावृत्त होणार असेल तर त्याला पोलीस दलाकडूनही पाठबळ देणे अपेक्षित आहे. त्यासाठी ‘आरोपी दत्तक’ योजना प्रभावी ठरणार आहे.

                                                                                  महेंद्र पंडित, पोलीस अधीक्षक, कोल्हापूर

Advertisement
Tags :

.