ड्रीम वर्ल्डच्या जागेसाठी 2 वर्षात मोजले 20 लाख
कोल्हापूर :
महापालिकेच्या रमणमळा येथील जागेत ड्रीम वर्ल्ड उभारण्यात आले होते. कंपनीचा करार संपल्यानंतर ही जागा रिकामी पडली असल्याने येथे ओपन बारचे चित्र पहावयास मिळत होते. यानंतर महापालिकेने या जागेभोवती पत्र्यांची संरक्षक भिंत उभारण्याचे टेंडर काढण्यात आले. महिन्याला 1 लाख रुपयांचे हे टेंडर 31 डिसेंबर पर्यंत होते. महापालिकेने या जागेच्या संरक्षणासाठी दोन वर्षात तब्बल 20 लाख रुपये खर्च केले आहेत. हि जागा कायम स्वरुपी उपयोगात यावी यासाठी महापालिकेने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
कसबा बावडा येथील रमणमळा परिसरातील जागा 2002 साली ज्ञानशांती अॅण्ड कंपनीने 29 वर्षे कराराने घेतली. कंपनीने या जागेमध्ये ड्रीमवर्ल्ड वॉटरपार्क उभा केला. 20 वर्षात कंपनीने महापालिकेला एक कोटी 75 लाख रुपये भरले. यानंतर या जागेच्या घरफाळ्यावरुन आरोप झाल्यानंतर या जागेवरील हक्क कंपनीने 2022 मध्ये सोडला. यानंतर या ठिकाणी गांजा ओढणाऱ्यांसह, तळीरामांचा वावर वाढला. या मोक्याच्या जागेवर अतिक्रमणासह अवैध व्यवसाय होवू लागले. यामुळे ही बकाल झालेली जागा महापालिकेसह आजूबाजूच्या रहिवाशांची डोकेदूखी वाढवू लागली. यामुळे महापालिकेच्या तत्कालीन प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी या जागेभोवती पत्रे मारुन जागेचे संरक्षण करण्याचा निर्णय घेतला. याचे टेंडर एका कंपनीस देण्यात आले. नोव्हेंबर 2022 मध्ये महिन्याला 1 लाख रुपये कराराने या कंपनीस ठेका देण्यात आला. यानंतर प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी पदभार स्विकारल्यानंतर 1 लाख रुपयांचा करार कमी करण्यात आला. मात्र आत्तापर्यंत रमणमळा येथील जागेच्या संरक्षणासाठी तब्बल 2 वर्षात 20 लाख रुपयांची रक्कम ठेकेदाराला अदा केली आहे.
गुरुवारी या ठेकेदाराच्या कराराची मुदत संपल्यानंतर पुढील ठेका न निघाल्याने ठेकेदाराने ड्रिमवर्ल्ड भोवती असणारे पत्रे काढले आहेत. आता या जागेत पुन्हा तळीरामांचा अड्डा होणार काय असा सवाल परिसरातील नागरीकांकडून उपस्थित केला जात आहे. या जागेचा योग्य वापर करण्याची मागणीही परिसरातील रहिवाश्यांकडून केली जात आहे.