झेप्टोचे मूल्यांकन 41 हजार कोटींपार
वृत्तसंस्था/ बेंगळूर
किराणा मालाच्या डिलिव्हरीमध्ये कार्यरत असणाऱ्या झेप्टोचे मूल्यांकन 40 टक्क्यांनी वाढून 41 हजार 931 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. झेप्टोच्या एका अधिकाऱ्याने या संदर्भातली माहिती दिली आहे.
निधी उभारण्याच्या उपक्रमाच्या माध्यमातून अलीकडेच कंपनीने 2851 कोटी रुपयांची उभारणी केली आहे. या तिच्या उपक्रमामध्ये जनरल कॅटलिस्ट पार्टनर्स, ड्रॅगन फंड, एपिक कॅपिटल, लाईट स्पीड वेंचर पार्टनर्स आणि डीएसटी ग्लोबल यांचा समावेश राहिला होता. तीन वर्षांपूर्वी सुरु झालेल्या कंपनीने जूनमध्ये प्राथमिक निधी उभारणीच्या उपक्रमामध्ये 5577 कोटी रुपये उभारले होते. त्यावेळी कंपनीचे मूल्यांकन 30,190 कोटी रुपयांवर पोहोचले. 2023 मध्ये कंपनीला युनिकॉर्नचा दर्जा मिळाला आहे. याचवर्षी 1970 कोटी रुपयांचा निधी कंपनीने उभारला होता.
काय म्हणाले सीईओ
झेप्टो कंपनीचे सीईओ अदित पालिचा म्हणाले की 100 कोटी डॉलर्सच्या विक्रीच्या माध्यमातून अडीच वर्षांमध्ये किराणा मालाच्या क्षेत्रामध्ये कंपनीने दमदार कामगिरी केली आहे. जगभरातील कोणत्याही इंटरनेट कंपन्यांमध्ये पाहता झेप्टोची कामगिरी अव्वल दिसून आली आहे. लवकरच आम्ही आमचा आयपीओ सादर करण्याचा विचार करत आहोत. आगामी काळामध्ये कंपनी जयपूर, चंदिगड आणि अहमदाबाद यासह इतर नव्या शहरांमध्ये प्रवेश करणार आहे. उभारण्यात आलेल्या निधीचा वापर मुंबई, दिल्ली आणि बेंगळूरसह इतर शहरांमध्ये बाजारातील हिस्सा वाढवण्यासाठी केला जाणार आहे.