पुतीन यांच्यानंतर झेलेंस्की येणार दौऱ्यावर
पुढील महिन्यात दौऱ्याची योजना : युक्रेनचे अध्यक्ष पहिल्यांदा भारतात येणार
वृत्तसंस्था/ कीव्ह
रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांच्यानंतर आता युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की हे पुढील महिन्यात भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. परंतु त्यांच्या दौऱ्याच्या तारखा अद्याप जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. झेलेंस्की यांचा हा पहिला भारत दौरा ठरणार आहे. युक्रेनच्या अध्यक्षांनी आतापर्यंत केवळ तीनवेळा भारताचा दौरा केला आहे. यात 1192, 2002 आणि 2012 चा दौरा सामील आहे. व्हिक्टर यानुकोविच हे भारत दौऱ्यावर आलेले अखेरचे युक्रेनचे अध्यक्ष होते.
भारत रशिया आणि युक्रेनदरम्यान संतुलन राखू इच्छित आहे. 2024 मध्ये देखील भारताने हेच धोरण अवलंबिले होते. पंतप्रधान मोदी हे प्रथम मॉस्कोच्या दौऱ्यावर गेले होते आणि पुतीन यांना भेटले होते. याच्या काही आठवड्यांनी मोदी हे युव्रेनची राजधानी कीव्हच्या दौऱ्यावर पोहोचले होते. भारत आणि युक्रेनच्या अधिकाऱ्यांदरम्यान मागील अनेक आठवड्यांपासून झेलेंस्की यांच्या दौऱ्यासंबंधी चर्चा सुरू आहे. ही चर्चा पुतीन यांच्या दौऱ्यापूर्वीच सुरू झाली होती.
अनेक घटकांवर दौरा निर्भर
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची शांतता योजना कुठल्या दिशेने जाते, युद्धाची स्थिती काय राहते आणि युक्रेनचे राजकारण कसे पुढे जाते यावर झेलेंस्की यांच्या दौऱ्याचे स्वरुप निर्भर असणार आहे. युक्रेनमध्ये सध्या झेलेंस्की यांचे सरकार भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे दबावात आहे. 2022 मध्ये युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून पंतप्रधान मोदी हे पुतीन आणि झेलेंस्की यांच्याशी सातत्याने चर्चा करत आहेत.
पंतप्रधान मोदींकडून निमंत्रण
पंतप्रधान मोदी हे ऑगस्ट 2024 मध्ये युक्रेनच्या दौऱ्यावर पोहोचले होते. तेव्हा त्यांनी झेलेंस्की यांना भारत दौऱ्याचे निमंत्रण दिले होते. भारत नेहमीच शांततेचा पुरस्कर्ता राहिला आहे. ही युद्धाची वेळ नसल्याचा संदेश पुतीन यांना दिला असल्याचे मोदींनी झेलेंस्की यांच्यासोबतच्या बैठकीत म्हटले होते.