झहीर खान लखनौचा मेंटर
आयपीएल 2025 साठी नवी जबाबदारी गौतम गंभीरची घेणार जागा
वृत्तसंस्था /लखनौ, नवी दिल्ली
आयपीएल 2025 साठी लखनौ सुपर जायट्संने माजी वेगवान गोलंदाज झहीर खानची संघाच्या मेंटरपदी नियुक्ती केली आहे. लखनौ सुपर जायट्संने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स‘वर व्हिडिओ शेअर करुन ही माहिती दिली आहे. विशेष म्हणजे, झहीर खान टीम इंडियाचा प्रशिक्षक गौतम गंभीरची जागा घेणार आहे. गंभीरने 2023 मध्ये पद सोडल्यापासून हे पद रिक्त होते, यानंतर बुधवारी लखनौ व्यवस्थापनाने याबाबतची घोषणा केली आहे. मागील काही सत्रात लखनौ संघाला चांगली कामगिरी करता आलेली नाही, यामुळे झहीरच्या आगमनानंतर लखनौ संघाची कामगिरी कशी होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानचे दीर्घ कालावधीनंतर आयपीएलमध्ये पुनरागमन झाले आहे.
व्यावसायिक क्रिकेटला अलविदा केल्यानंतर एकेकाळी मुंबई इंडियन्सच्या क्रिकेट ऑपरेशन्सचे संचालकपद भूषवणारा झहीर आता आगामी मोसमात लखनौ सुपर जायंट्स (एलएसजी) संघाच्या मार्गदर्शकाची (मेंटर) जबाबदारी पार पाडणार आहे. गौतम गंभीरने 2023 मध्ये लखनौची साथ सोडल्यानंतर मेंटरपद रिकामी होते. त्यासोबतच गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्नी मॉर्केल देखील सपोर्ट स्टाफमधून बाहेर पडल्याने लखनौला मोठ्या खेळाडूच्या मार्गदर्शकाची गरज होती. आता झहीर खानची निवड करुन संघाने मोठी खेळी खेळली आहे. झहीरचा अनुभव नक्कीच संघातील खेळाडूंच्या कामी येणार आहे. संघातून बाहेर पडल्यानंतर गौतम गंभीर आणि मॉर्नी मॉर्केल टीम इंडियाशी जोडले गेले आहेत.
ज्यामध्ये बीसीसीआयने गौतम गंभीरकडे हेड कोच तर मॉर्केलकडे गोलंदाजी प्रशिक्षकाची जबाबदारी सोपवली आहे. दरम्यान, जस्टिन लँगर हे लखनौ संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी सांभाळत आहेत. लान्स क्लुसनर आणि अॅडम व्होजेस हे संघाचे सहाय्यक प्रशिक्षक आहेत. झहीरच्या आगमनानंतर कोचिंग स्टाफमध्ये कोणताही बदल होणार नाही. पण झहीर मेंटर होण्यासोबतच इतर जबाबदाऱ्या पार पाडणार असल्याचे लखनौ संघ व्यवस्थापनातर्फे सांगण्यात आले. झहीर खानने 2008 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले. यानंतर 2017 मध्ये तो शेवटचा सामना खेळला. मुंबई इंडियन्स, आरसीबी व दिल्ली संघातून तो खेळला आहे. आयपीएलमधून निवृत्त झाल्यानंतर तो 2018 ते 2022 पर्यंत मुंबई इंडियन्ससोबत राहिला. झहीरने आयपीएलमध्ये 100 (102 बळी) सामने खेळले आहेत.