For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मेदव्हेदेव, फ्रिट्झ, मोनफिल्स, रायबाकिना दुसऱ्या फेरीत

06:58 AM Jan 15, 2025 IST | Tarun Bharat Portal
मेदव्हेदेव  फ्रिट्झ  मोनफिल्स  रायबाकिना दुसऱ्या फेरीत
Advertisement

बेरेटिनी, होल्गर रुने, चीही आगेकूच, बोपन्नाचे दुहेरीतील आव्हान संपुष्टात, ब्रुक्सबाय, एम्पेटशी पेरिकार्ड पराभूत

Advertisement

वृत्तसंस्था / मेलबोर्न

2025 च्या टेनिस हंगामातील येथे सुरू झालेल्या पहिल्या ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत मंगळवारी तिसऱ्या दिवशी पुरुष एकेरीत अमेरिकेचा चौथा मानांकित टेलर फ्रिट्झ, फ्रान्सचा मोनफिल्स तसेच रशियाचा डॅनिल मेदव्हेदेव, इटलीचा मॅटो बेरेटेनी यांनी विजयी सलामी देत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. मात्र भारताच्या रोहन बोपन्नाचे पुरुष दुहेरीतील आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त झाले. महिला विभागात कझाकस्थानची इलिना रायबाकिना, ब्रिटनची इमा राडुकेनू, अॅनिसिमोवा, नेव्हारो यांनी दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.

Advertisement

मंगळवारी पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीतील सामन्यात अमेरिकेच्या चौथ्या मानांकित टेलर फ्रिट्झने आपल्या देशाच्या जेनसन ब्रुक्सबायचा 6-2, 6-0, 6-3 अशा सरळ सेटस्मध्ये पराभव करत विजयी सलामी दिली. टेलर फ्रिट्झने या स्पर्धेत सलग सातव्यावर्षी दुसरी फेरी गाठली आहे. फ्रिट्झने 2024 च्या अमेरिकन ग्रँडस्लॅम स्पर्धेत एकेरीची अंतिम फेरी गाठली होती.

दुसऱ्या एका पहिल्या फेरीतील सामन्यात इटलीच्या मॅटो बेरेटिनीने ब्रिटनच्या कॅमेरुन नुरीचे आव्हान 6-7 (4-7), 6-4, 6-1, 6-3 अशा चार सेटस्मधील लढतीत संपुष्टात आणताना 32 बिनतोड सर्व्हिसची नोंद केली. 2022 साली या स्पर्धेत बेरेटिनीने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. बेरेटिनीचा पुढील फेरीतील सामना डेन्मार्कच्या रुनेशी होणार आहे. डेन्मार्कच्या होल्गर रुनेने चीनच्या झेंग झीझेनचा 4-6, 6-3, 6-4, 3-6, 6-4 अशा 5 सेटस्मधील लढतीत पराभव करत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. हा सामना 3 तास 10 मिनिटे चालला होता.

फ्रान्सच्या गेल मोनफिल्सने पहिल्या फेरीतील सामन्यात आपल्याच देशाच्या गिव्होनी एम्पेटशीचा 7-6 (7-5), 6-3, 6-7 (6-8), 6-7 (5-7), 6-4 अशा पाच सेटस्मधील लढतीत पराभव करत विजयी सलामी दिली. हा सामना साडेतीन तास चालला होता. 38 वर्षीय मोनफिल्सला 21 वर्षीय एम्पेटशी  पेरीकार्डकडून कडवा प्रतिकार मिळाला. ऑकलंडमध्ये अलिकडेच झालेल्या एटीपी टूरवरील टेनिस स्पर्धेत फ्रान्सच्या मोनफिल्सने बर्जेसचा पराभव करुन जेतेपद मिळविले. एटीपीटूरवरील स्पर्धा जिंकणारा मोनफिल्स सध्या सर्वात वयस्कर टेनिसपटू ठरला आहे.

रशियाच्या डॅनिल मेदव्हेदेवने दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळविताना थायलंडच्या वाईल्डकार्डधारक केडीट सॅमरेजचे आव्हान 6-2, 4-6, 3-6, 6-1, 6-2 असे संपुष्टात आणले. या लढतीत थायलंडच्या सॅमरेजने दर्जेदार खेळ करत मेदव्हेदेवला विजयासाठी चांगलेच झुंजविले. पाचव्या मानांकित मेदव्हेदेवने 2021 साली अमेरिकन ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकली असून त्याने तीनवेळा ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धेत उपविजेतेपद मिळविले आहे. हा सामना तब्बल 3 तास चालला होता. दोन्ही खेळाडूंकडून बेसलाईन खेळावर आणि वेगवान सर्व्हिसवर भर दिला जात होता. मात्र मेदव्हेदेवने अनुभवाच्या जोरावर हा सामना जिंकला.

कॅमेऱ्याची काच फुटली

या सामन्यात तिसऱ्या सेटच्या शेवटच्या गेमवेळी 13 फटक्यांचा गुण गमविल्यानंतर निराश झालेल्या मेदव्हेदेवने टेनिस रॅकेट भिरकावली. या टेनिस रॅकेटने नेटमध्ये असलेल्या छोट्या @ढमेऱ्याची काच फोडली. ही घटना तिसऱ्या सेटस्मधील शेवटच्या गेममध्ये घडली. सॅमरेजचा अचूक फटका परतविण्यात मेदव्हेदेवला अपयश आले. त्यानंतर तो स्वत:ला सावरु शकला नाही आणि रागाने रॅकेट भिरकविली. मेदव्हेदेवकडून शिस्तपालन नियमाचा भंग झाल्याने सामन्यातील कोर्टवर उपस्थित असलेल्या पंचांनी त्याला ताकीद दिली.

बोपण्णा दुहेरीत पराभूत

पुरुष दुहेरीत भारताच्या रोहन बोपन्नाचे आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त झाले. स्पेनच्या पेद्रो मार्टिनेस आणि जॉमी मुनार यांनी बोपन्ना आणि त्याचा कोलंबियन साथीदार बॅरेनटोस यांचा 7-5, 7-6 (7-5) अशा सरळ सेटस्मध्ये पराभव करत दुसऱ्या फेरीत स्थान मिळविले. या स्पर्धेत पुरुष एकेरीत सहभागी झालेल्या भारताच्या सुमित नागलचे आव्हान सोमवारी झेकच्या मॅकहेककडून समाप्त झाले. 44 वर्षीय बोपन्नाने गेल्या वर्षी या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच्या एब्डनसमवेत ऐतिहासिक दुहेरीचे जेतेपद मिळविले होते. तसेच या जोडीने गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात झालेल्या एटीपी फायनल्स स्पर्धेत आपला शेवटचा सहभाग दर्शविला होता.

रायबाकिना दुसऱ्या फेरीत

महिला एकेरीच्या सामन्यातील मंगळवारी पहिल्या फेरीत कझाकस्थानच्या माजी विम्बल्डन विजेत्या इलिना रायबाकिनाने विजयी सलामी देताना ऑस्ट्रेलियाच्या इमर्सन जोन्सचा 6-1, 6-1 अशा सरळ सेटस्मध्ये फडशा पाडला. या सामन्यात रायबाकिनाने 11 बिनतोड सर्व्हिसची नोंद करीत केवळ 53 मिनिटात आपला विजय नोंदविला.

दुसऱ्या एका सामन्यात ब्रिटनच्या इमा राडुकेनुने 26 व्या मानांकित एक्तेरीना अॅलेक्सांड्रोव्हाचा 7-6 (7-4), 7-6 (7-2) असा पराभव करत दुसरी फेरी गाठली. या सामन्यात राडुकेनूला विजयासाठी चांगलेच झगडावे लागले. राडुकेनूचा पुढील फेरीतील सामना अमंदा अॅनिसिमोव्हाशी होणार आहे. अॅनिसिमोव्हाने पहिल्या फेरीतील सामन्यात मारिया कार्लेवर 6-2, 6-3 अशी मात केली आहे. अमेरिकेच्या आठव्या मानांकित इमा नेव्हारोने आपल्याच देशाच्या पेटॉन स्ट्रिम्सचा 6-7 (5-7), 7-6 (7-5), 7-5 असा पराभव केला. हा सामना 3 तास 20 मिनिटे चालला होता. गेल्या वर्षी नेव्हारोने अमेरिकन ग्रँडस्लॅम स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती.

Advertisement
Tags :

.