येडियुराप्पा यांना ‘झेड’ श्रेणी सुरक्षा
बेंगळूर : केंद्रीय गृहमंत्रालयाने माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ भाजप नेते बी. एस. येडियुराप्पा यांना ‘झेड’ श्रेणीची सुरक्षा व्यवस्था पुरविली आहे. राज्यात कट्टरपंथी गटाकडून संभाव्य धोक्यांचा विचार करून केंद्रीय गृहमंत्रालयाने हा निर्णय घेतल्याचे समजते. येडियुराप्पांना अचानक उच्च श्रेणीची सुरक्षा पुरविण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उत आला आहे. अलीकडेच इंटेलिजन्स ब्युरोने येडियुराप्पांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा सल्ला दिला होता. येडियुराप्पा यांना कट्टरपंथी गटाकडून धोका असल्याची माहिती मिळाल्याने केंद्रीय गृहमंत्रालयाने ठोस पाऊल उचलले आहे. त्यानुसार त्यांना सीआरपीएफ कमांडोंकडून सुरक्षा पुरविली जाणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येडियुराप्पांना 33 झेड श्रेणी सुरक्षा कर्मचारी सुरक्षा प्रदान करतील. याव्यतिरिक्त 10 सशस्त्र स्टॅटीक गार्ड त्यांच्या निवासस्थानी तैनात असतील. शिवाय सुरक्षा व्यवस्था सुनिश्चित करण्यासाठी सहा वैयक्तिक सुरक्षा अधिकारी (पीएसओ) नेमण्यात येणार आहेत. संभाव्य धोक्यांपासून सतत सतर्क राहण्यासाठी 12 सशस्त्र एस्कॉर्ट कमांडो तीन शिफ्टमध्ये तैनात केले जातील. सुरक्षा व्यवस्थेवर लक्ष ठेवण्यासाठी दोन निरीक्षकांची शिफ्ट पद्धतीने नेमणूक केली जाणार आहे. याशिवाय त्यांच्यासाठी तीन प्रशिक्षित ड्रायव्हर्स सज्ज असतील.