सुपरस्पेशालिटी रुग्णालयात तज्ञ डॉक्टरांची नेमणूक करा
भाजपच्या राज्य उपाध्यक्ष रुपाली नाईक यांची मागणी
कारवार : येथील जिल्हा रुग्णालयाच्या आवारात बांधण्यात आलेल्या सुपरस्पेशालिटी रुग्णालयात पहिल्यांदा तज्ञ डॉक्टरांची नेमणूक करा, एमआरआय आणि इतर अत्याधुनिक उपकरणे उपलब्ध करा आणि त्यानंतर सुपरस्पेशालिटी रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी या, असे आवाहन कारवार-अंकोलाच्या माजी आमदार आणि भाजपच्या राज्य उपाध्यक्ष रुपाली नाईक यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना केले आहे. त्या येथे पत्रकारांशी बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, 22 डिसेंबर रोजी येथील सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे, अशी माहिती मिळाली आहे. रुग्णालयासाठी भाजप सरकार असताना 150 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता.
त्यानंतर काँग्रेसच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने कोणत्याही प्रकारचा निधी मंजूर केला नाही आणि म्हणूनच सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचे उद्घाटन करण्याचा नैतिक हक्क मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना नाही. येथील जिल्हा रुग्णालयाच्या आवारात सुपरस्पेशालिटी व्हावे म्हणून आपण कारवार-अंकोला आमदार या नात्याने तब्बल 32 वेळा राज्यात भाजपचे सरकार असताना सरकार दरबारी अर्ज केले. त्यानंतर मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी रुग्णालय उभारण्यासाठी 150 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. त्यामुळेच येथे रुग्णालय बांधकामाचे कार्य पूर्णत्वाला गेले आहे. आता 22 डिसेंबरला मुख्यमंत्री रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी कारवारला येत आहेत, असे समजते. येथील विद्यमान आमदारांनी एक नव्हे. दोन सुपरस्पेशालिटी रुग्णालये उभारु असे सांगितले होते.
तथापि, भाजप सरकारने मंजूर केलेल्या निधीतून उभारण्यात आलेल्या रुग्णालयात एमआरआय सारखी उपकरणे अद्याप दाखल झालेली नाहीत. तज्ञ डॉक्टरांनी नेमणूक करण्यात आलेली नाही. त्यामुळे येथील रुग्णांना हुबळी, बेळगाव, मडगाव, उडुपी, मंगळूर, मणीपालसारख्या दूरवरच्या ठिकाणी उपचारांसाठी जावें लागत आहे. सुपरस्पेशालिटी रुग्णालयात 34 उपकरणांच्या खरेदीसाठी 30 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. तथापि, ही रक्कमही मंजूर करण्यात आलेली नाही. रुग्णालयात कोणत्याही सुविधा उपलब्ध करुन न देता मुख्यमंत्र्यांना उद्घाटन सोहळ्यासाठी येथे येणे याबद्दल आक्षेप आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. आहे.