‘काडा’चा पदभार युवराज कदम यांनी स्वीकारला
सिंचन सुविधा-पाणीपुरवठा-शेतीपूरक विकास योजनेवर भर देणार : पत्रकारांशी साधला संवाद
वार्ताहर/उचगाव
शेतकऱ्यांचे प्रश्न हे माझ्यासाठी सर्वोच्च प्राधान्य असणार आहे. सिंचन सुविधा आणि पाणीपुरवठा योजना, शेतीपूरक विकास योजनेवर विशेष भर दिला जाईल. या नियुक्तीमुळे ग्रामीण मराठी समाजाला राजकीय प्रतिनिधित्व देऊन काँग्रेस पक्षाने माझ्यावर जो विश्वास ठेवला आहे तो सार्थ करीन, असे मनोगत बेळगाव ग्रामीणचे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते युवराज कदम यांनी मलप्रभा घटप्रभा नदीखोरे विकास महामंडळ ‘काडा’च्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर सोमवारी सकाळी त्यांनी कार्यालयात आपला पदभार स्वीकारला. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
युवराज कदम पुढे म्हणाले, ग्रामीण भागात ज्या नद्या, नाले आहेत. या नद्या, नाल्यांना बंधारे घालून पाण्याचा साठा केला तर बारमाही पाणी राहील आणि शेतामधून बारमाही भरघोस पिके शेतकरी वर्गाकडून घेतली जातील. यामुळे आपल्या भागातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती उंचावेल यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील राहीन. तसेच आपल्या भागामध्ये पावसाळ्यामध्ये भरपूर पाऊस पडतो. मात्र या पावसाचे पाणी वाहून जाते. या पाण्याचा उपयोग धरणांच्या माध्यमातून जर साठवले गेले तर त्याचा निश्चितच शेतीसाठी उपयोग होईल. युवराज कदम हे उचगाव गावचे सुपुत्र असून त्यांनी यापूर्वी बुडा आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्षपदही भूषवलेले होते. यावेळी त्यांची कामगिरीही उल्लेखनीय आहे. यामुळेच त्यांना पुन्हा काडाचे अध्यक्षपदी बहाल करण्यात आले आहे. यामुळे त्यांना ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा आणि राजकारणाचा चांगला अभ्यास आहे.
सोमवारी सकाळी काडा कार्यालयामध्ये त्यांच्यासोबत पालकमंत्री सतीश जारकीहोळी, तसेच महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या समवेत त्यांचे काडा कार्यालयात आगमन झाले. यावेळी बेळगाव भागातून काँग्रेस पक्षाचे जवळपास सहाशे समर्थक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी काडा कार्यालयाचे फित कापून उद्घाटन सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यालयात लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते पूजन कार्यक्रम पार पडला. युवराज कदम यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचा सतीश जारकीहोळी आणि लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार राजू शेठ, आमदार राजू कागे, आमदार चन्नराज हट्टीहोळी, काँग्रेस जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी व काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते उपस्थित होते.