सत्ताधारी-विरोधी पक्षांनी बाह्या सरसावल्या
बेळगावात आजपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन : पहिल्या दिवशी मांडणार शोक प्रस्ताव : 25 विधेयके मांडण्याची सरकारची तयारी
बेळगाव : कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवार दि. 8 डिसेंबरपासून सुरू होत आहे. सरकारची कोंडी करण्यासाठी प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपने तयारी केली असून सत्ताधारी काँग्रेसनेही विरोधकांचे हल्ले समर्थपणे परतावण्यासाठी एकीचा मंत्र जपला आहे. पहिल्या दिवशी दोन्ही सभागृहात शोक प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. या अधिवेशनात सुमारे 25 विधेयके मांडण्याची तयारी सरकारने केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी 20 हजारहून अधिक शेतकऱ्यांना सोबत घेऊन विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवार दि. 9 डिसेंबर रोजी सुवर्ण विधानसौधला घेराव घालण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
सभागृहाबाहेर व सभागृहाच्या आतही मका, ऊस व पाणीप्रश्नावर चर्चा करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. दरवर्षी अधिवेशन जवळ आले की ऊसउत्पादक शेतकरी आंदोलन सुरू होते. इतर संघटनाही रस्त्यावर उतरतात. उत्तर कर्नाटकाच्या विकासाच्या मुद्द्यावर अधिवेशनातही चर्चा होते. प्रत्यक्षात कृतीत मात्र काहीच येत नाही, असा अनुभव आहे. बेळगाव अधिवेशनाच्या आधी पक्षातील अंतर्गत संघर्षाला अल्पविराम देण्यासाठी हायकमांडने पुढाकार घेतला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या व उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी एकीचा सूर आळवला आहे.
बेळगाव अधिवेशनात पक्षाची कोंडी होऊ नये म्हणून हायकमांडने काळजी घेतली आहे. 19 डिसेंबर रोजी अधिवेशनाचे सूप वाजणार आहे. त्यानंतर पुन्हा सत्तासंघर्ष रंगणार आहे. नवी दिल्ली येथे सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, के. सी. वेणुगोपाल यांच्या उपस्थितीत कर्नाटकातील घडामोडींवर बैठकही झाली आहे. बेळगाव अधिवेशनानंतर ठोस निर्णय होण्याची शक्यता आहे. बेळगावातही एकीचे दर्शन घडवून विरोधकांना निष्प्रभ करण्याची व्यूहरचना काँग्रेसने आखली आहे. सुरुवातीला अविश्वासाचा प्रस्ताव दाखल करण्याचे भाजपने ठरविले होते. संख्याबळाअभावी त्याचे हसे होणार म्हणून आता स्थगन प्रस्ताव मांडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाजप व त्यांचा मित्र पक्ष असलेल्या निजदच्या आमदारांनी एकत्रितपणे सरकारविरुद्ध सभागृहात उभे ठाकण्याचे ठरविले आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी काँग्रेस संसदीय पक्ष बैठक होणार आहे.
उपमुख्यमंत्र्यांचा सोमवारी खाडा
पहिल्याच दिवशी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार विधिमंडळाच्या कामकाजाला गैरहजर राहणार आहेत. रविवारी त्यांचा सोमवारचा दौरा जाहीर झाला आहे. रायझिंग ग्लोबल समिटमध्ये भाग घेण्यासाठी सोमवारी सकाळी विशेष विमानाने ते हैद्राबादला जाणार आहेत. सायंकाळी बेंगळूरला येऊन ते मुक्काम करणार आहेत. मंगळवार दि. 9 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजता सांबरा विमानतळावर त्यांचे आगमन होणार आहे. दुसऱ्या दिवशीच्या कामकाजात ते भाग घेणार आहेत.
मुख्यमंत्री बेळगावात दाखल
अधिवेशनासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या रविवारी बेळगावात दाखल झाले आहेत. जिल्ह्यातील नेते व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुवर्ण विधानसौधसमोर असलेल्या हेलिपॅडवर त्यांचे स्वागत केले. मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा पंचायतीचे सीईओ राहुल शिंदे, पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे, जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद आदींसह जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. हेलिपॅडवर पोलीस दलाकडून त्यांना मानवंदना देण्यात आली.