युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी दिली डॉ. चेतन नरकेंच्या निवासस्थानी भेट
राजकारणासह विविध विषयांवर चर्चा
कोल्हापूर प्रतिनिधी
कोल्हापूर : युवासेनेचे प्रमुख आमदार आदित्य ठाकरे गेले दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर होते. बुधवारी त्यांनी व्यस्त दौऱ्यातून वेळ काढत गोकुळचे संचालक तथा थायलंड देशाचे वाणिज्य विषयक सल्लागार डॉ. चेतन नरके यांच्या शिवाजी पेठेतील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी डॉ. नरके यांच्यासह त्यांचे वडील गोकुळचे माजी चेअरमन अरुण नरके यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. कोल्हापूरच्या राजकारणासह सहकार आणि दूग्ध व्यवसायाचीही माहिती घेतली. नरके परिवाराच्या वतीने अरुण नरके यांनी आदित्य ठाकरे यांचे स्वागत केले. यावेळी शिवसेना (ठाकरे गट) नेते खासदार अनिल देसाई, उपनेते नितीन बानुगडे-पाटील, डॉ. नरके यांच्या भगिनी लिना तुपे, पत्नी सौ. स्निग्धा नरके, सत्यशील नरके उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीसाठी डॉ. चेतन नरके शिवसेनकडून इच्छुक आहेत. या पार्श्वभूमीवर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची ही सदिच्छा भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली. दरम्यान, या भेटीत लोकसभा उमेदवारीबाबत मी सकारात्मक आहे. अंतिम निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे घेतील, असे आदित्य ठाकरे यांनी डॉ. चेतन नरके यांना सांगिल्याचे समजते.
ठाकरेंच्या दौऱ्यात कारमध्ये चेतन नरके
आदित्य ठाकरे यांनी कोल्हापूर दौऱ्यात गारगोटी, कोल्हापूर शहर आणि हुपरी येथे सभा, मेळावे घेतले, पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी संपूर्ण दौऱ्यात त्यांनी आपल्या कारमध्ये डॉ. चेतन नरके यांना बरोबर घेतले होते. ठाकरे आणि डॉ. नरके यांच्यातील मैत्री सर्वश्रृत आहे. या मैत्रीची चर्चा या दौऱ्याच्या निमित्ताने रंगली.