Devendra Fadnavis | इचलकरंजीतील ‘शंभू तीर्थ’चे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार
छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते
इचलकरंजी : इचलकरंजी येथील महानगर पालिकेच्या वतीने साकारण्यात आलेल्या श्री शंभू तीर्थचा लोकार्पण सोहळा सोमवार दि. १५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते पार पडणार आहे. यावेळी लोकप्रतिनिधींसह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती आयुक्त पल्लवी पाटील यांनी दिली. इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने शहरातील कॉ. के. एल. मलाबादे चौक येथे श्री शंभू तीर्थ साकारून तेथे छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा साकारण्यात आला आहे.
दि. ३ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता संभाजी महाराजांच्या पुतळ्याचा मुखदर्शन सोहळा पारपडला आहे. त्यानंतर राजर्षी शाहू महाराज पुतळ्यापासून भव्य मिरवणूक काढण्यात आली. ५ डिसेंबर रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत विधीवत प्रतिष्ठापना करण्यात आली. त्याच दिवशी शिवचरीत्र अभ्यासक दिग्पाल लांजेकर यांनी श्वासात राजं, ध्यासात राजं हा छत्रपतींच्या जीवनावरील संगीतमय कार्यक्रम सादर केला. ६ डिसेंबर रोजी एक हजार ढोल वादकांकडून मानवंदना देण्यात आली.
या शंभू तीर्थचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार असल्याच्या वृत्ताने शहरातील नागरिकांमध्ये कमालीची उत्सुकता होती. अखेर सोमवार दि. १५ रोजी विविध विकासकामांचे भूमिपूजन व शंभू तीर्थचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती देण्यात आली. सर्व शहरवासीयांनी या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांनी केले आहे.
महाराजांच्या पुतळ्याची कोल्हापुरात निर्मिती
हा पुतळा कोल्हापुरातील मोरेवाडी येथील संकपाळ आणि दाते या मूर्तीकारांकडून तयार करून घेतला आहे. ब्राँझ या धातूपासून बनवलेला हा ११ फूट उंच व पंधराशे किलो बजनाचा पुतळा आहे. या निमित्ताने आठवडाभरापासून शहरातील स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांकडून विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.