पाक अधिकाऱ्याशी होते युट्यूबरचे घनिष्ठ संबंध
हेरगिरीचा आरोप : पाकिस्तान दौऱ्याचा अधिकाऱ्याने उचलला होता खर्च
वृत्तसंस्था/ चंदीगड
हरियाणाची रहिवासी आणि ‘ट्रॅव्हल विथ जो’ नावाने युट्यूब चॅनेल चालविणारी व्लॉगर ज्योति मल्होत्राला पाकिस्तानसाठी हेरगिरी करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. प्रारंभिक तपासात तिचे पाकिस्तानी दूतावासातील एका अधिकाऱ्याशी घनिष्ठ संबंध असल्याचे उघड झाले आहे. या पाकिस्तानी अधिकाऱ्याला भारत सरकारकडून यापूर्वीच देशातून हाकलण्यात आले आहे.
युट्यूबर ज्योति मल्होत्राचा एक व्हिडिओ व्हायरल होत असून यात ती पाकिस्तानी दूतावासात आयोजित इफ्तार पार्टीत संबंधित अधिकाऱ्यासोबत दिसून येत आहे. या अधिकाऱ्याला भारत सरकारने अलिकडेच हेरगिरीच्या आरोपाखाली ‘पर्सोना नॉन ग्राटा’ घोषित करत देशातून बाहेर काढले आहे. तपास यंत्रणांनुसार या पाकिस्तानी अधिकाऱ्याचे नाव एहसान-उर-रहीम उर्फ दानिश आहे. ज्योतिला 2023 मध्ये पाकिस्तानच्या प्रवासादरम्यान एक व्हिसा एजंटच्या माध्यमातून हा कॉन्टॅक्ट मिळाला होता. त्याचदरम्यान तिची दानिशशी भेट झाली आणि तेथूनच पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांसोबत संपर्काची सुरुवात झाली.
ज्योति आणि दानिश यांच्यात दिल्लीतील पाकिस्तानी दूतावासात अनेक भेटी झाल्याचे तपासात उघड झाले आहे. तसेच तिने व्हॉट्सअॅप, टेलिग्राम आणि स्नॅपचॅट यासारख्या प्लॅटफॉर्म्सवर पाकिस्तानी गुप्तचर हस्तकांशी संपर्क ठेवला होता आणि त्यांच्यापर्यंत संवेदनशील माहिती देखील पोहोचविली होती. ज्योतिच्या युट्यूब चॅनेलवर पाकिस्तानशी निगडित अनेक व्हिडिओ आहेत. तिच्या युट्यूब चॅनेलवर 3.7 लाख सब्सक्रायबर्स आणि इन्स्टाग्रामवर 1.3 लाख फॉलोअर्स ओत. ज्योति मल्होत्रा सध्या पोलीस कोठडीत असून तिची कसून चौकशी केली जात आहे. याप्रकरणी आणखी खुलासे होऊ शकतात असे सुरक्षा यंत्रणांचे सांगणे आहे.