रंकाळा टॉवर परिसरात तरुणांकडून दहशत माजाविण्याचा प्रयत्न
मोटारीला धडक लागल्याच्या कारणातून तरुणास मारहाण
कोल्हापूर
मोटारीला धडक लागल्याच्या किरकोळ कारणातून रंकाळा टॉवर परिसरात एका टोळक्याने दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. रविवारी सायंकाळच्या सुमारास घडलेल्या या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले होते. या टोळक्याने हॉकी स्टीक, बेसबॉल बॅट हातात घेऊन घरात घुसून परिसरातील तरूणांना मारहाण केली. या घटनेची नोंद करण्याचे काम रात्री उशिरा पर्यंत सुरु होते.
याबाबत अधिक माहिती अशी की, पानारी मळ्यात राहणाऱ्या एका तरुणाची मोटार रविवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास रस्त्याकडेला उभी होती. यावेळी शेजारून जाणाऱ्या दुचाकीची धडक या मोटारीस लागली. याचा जाब विचारत आलेल्या मोटार मालकासोबत या दुचाकीस्वाराचा वाद झाला. यानंतर तो दुचाकीस्वार निघून गेला होता. पण, याचा राग मनात धरून संबधित मोटार मालकाने काही तरूणांना बोलावून घेतले. हॉकी स्टीक, बेसबॉलच्या बॅट, काठ्या हातात घेऊन तरुणांचे टोळके रंकाळा टॉवर परिसरात आले. मुख्य रस्त्यावर वाहनांच्या गर्दीतून हत्यारांसोबत आलेल्या टोळक्याला पाहून नागरिकांची धावपळ उडाली. येथील बेकरी शेजारील घरात शिरून एका तरुणाला मारहाणीचा प्रकार टोळक्याकडून झाला. दरम्यान रंकाळा टॉवरकडून करवीर पोलीस ठाण्याची मोटार निघाली होती. पोलिसांची ही मोटार पाहताच त्या टोळक्याने घटनास्थळावरुन पलायन केले.