युवा विश्वचषक स्पर्धा लंकेऐवजी दक्षिण आफ्रिकेत
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
2024 साली होणाऱ्या आयसीसीच्या पुरूषांच्या 19 वर्षाखालील वयोगटाच्या युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या ठिकाणात बदल करण्यात आला आहे. आता ही स्पर्धा श्रीलंका ऐवजी दक्षिण आफ्रिकेत घेतली जाईल, अशी घोषणा आयसीसीने केली आहे.
अलिकडेच आयसीसीने लंकन क्रिकेट मंडळ निलंबित करण्याचा निर्णय घेतला होता. लंकन शासनाकडून लंकन क्रिकेट मंडळाच्या कारभारामध्ये हस्तक्षेप होत असल्याचे आढळून आल्याने आयसीसीने लंकन क्रिकेट मंडळ तात्पुरते निलंबित करण्याचा निर्णय घेतला होता. आयसीसीची 19 वर्षाखालील वयोगटातील पुरूषांची युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धा 2024 साली लंकेत घेतली जाणार होती. पण आता या समस्येमुळे या स्पर्धेच्या ठिकाणात बदल करण्यात आला आहे. भारतात नुकत्याच झालेल्या आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेनंतर येथे कार्यकारी मंडळाची बैठक झाली. या बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. 2020 सालातील आयसीसीची 19 वर्षाखालील वयोगटाची युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत भरवली गेली होती. आयसीसीच्या कार्यकारणी मंडळाच्या बैठकीमध्ये या निर्णयाला अधिकृत मान्यता देण्यात आली. दरम्यान लंकन क्रिकेट मंडळावर हंगामी स्वरुपाच्या निलंबणाच्या कारवाईमुळे त्यांच्या द्विपक्षीय आणि राष्ट्रीय क्रिकेट कार्यक्रमावर कोणताही विपरीत परिणाम होणार नसल्याचे आयसीसीच्या एका सदस्याने म्हटले आहे.
2024 ची आयसीसीची 19 वर्षाखालील वयोगटाची युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धा यापूर्वी लंकेत 13 जानेवारी ते 4 फेब्dरुवारी दरम्यान घेतली जाणार होती. दरम्यान लंकन क्रिकेट मंडळाच्या कारभारामध्ये लंकन शासनाचा हस्तक्षेप सुरूच असल्याने आयसीसीला या मंडळावर कारवाई करावी लागली. या समस्येमुळे लंकेला युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या यजमानपदालाही मुकावे लागले.