महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

देशसेवेसाठी तरुणांची खटपट, मात्र भरतीच्या ठिकाणी फरफट

11:24 AM Nov 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

देशभरातून आलेल्या युवकांना असुविधांचा फटका : खाद्यपदार्थ तसेच इतर वस्तूंची चढ्या दराने विक्री : युवकांकडून नाराजीचा सूर

Advertisement

बेळगाव : देशाची सेवा करून देशाचे नाव उंचावण्यासाठी तरुणाई प्रादेशिक सेनेच्या भरतीसाठी बेळगावमध्ये येत आहे. भरती प्रक्रियेदरम्यान हजारो तरुण शहरात येत आहेत. परंतु, त्यांच्यासाठी पायाभूत सुविधा नसल्याने त्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. ना शौचालयाची सोय, ना राहण्यासाठी आसरा, ना जेवणाची कोणतीही सोय. कडाक्याच्या थंडीत तरुण रस्त्याशेजारी जागा मिळेल तेथे झोपत असल्याने युवकांकडून नाराजीचा सूर उमटत असून प्रादेशिक सेनेने या तरुणांची सोय करणे गरजेचे होते, असे मत व्यक्त केले जात आहे. प्रादेशिक सेनेला वयाची अट शिथिल असल्यामुळे देशभरातील लाखो तरुण भरती प्रक्रियेत सहभागी होतात. चार वर्षांपूर्वी देखील बेळगाव शहरात अशाच प्रकारे मोठी गर्दी झाली होती. सध्याचे युवकांच्या बेरोजगारीचे प्रमाण पाहता लाखो तरुण येणार, हे माहिती असतानाही त्यांच्यासाठी पायाभूत सुविधा का उभारल्या नाहीत? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. शौचालयाची सोय नसल्याने तरुणांची गैरसोय झाली. किमान फिरत्या शौचालयाची तरी व्यवस्था करावी, अशी मागणी होत होती.

Advertisement

पिण्याचे पाणी नसल्याने गैरसोय

पिण्याचे पाणी उपलब्ध होत नसल्याने हॉटेल तसेच रस्त्याशेजारील खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर हे तरुण पाणी पिताना दिसून येत होते. भरती असलेल्या परिसरात खाद्यपदार्थांचे स्टॉल नसल्याने त्यांना एकतर रेल्वेस्टेशन अथवा धर्मवीर संभाजी चौकापर्यंत पायपीट करावी लागत होती. तरुणाईच्या या गैरसोयीला जबाबदार कोण? असाही प्रश्न उपस्थित होत होता.

चढ्या दराने विक्री

भरतीसाठी आलेली तरुणांची गर्दी पाहून खाद्यपदार्थ, फिल्टर पाणी तसेच इतर साहित्य चढ्या दराने विक्री केले जात होते. कॅम्प परिसरात बूट, टी-शर्ट, पँट, फिल्टर पाणी तसेच खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात आले होते. परंतु, काही स्टॉलवर अधिक दराने विक्री केली जात होती. यामुळे देशभरातून आलेल्या तरुणांनी नाराजी व्यक्त केली. तसेच या सर्व प्रकारामुळे शहराच्या नावालाही बाधा निर्माण झाली आहे.

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसाठी आज भरती

सोमवारी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसाठी भरती होणार आहे. अहमदनगर, अकोला, संभाजीनगर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, नंदूरबार, सोलापूर, सांगली, सातारा, पुणे, अमरावती, बीड, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांतील शेकडो तरुण शहरात आले आहेत. यामुळे शहरात सर्वत्र या तरुणांचीच गर्दी दिसून येत आहे. या भरतीमुळे लहान विक्रेत्यांनाही चांगला रोजगार मिळू लागला आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article