अथणी नगरपरिषदेला पालिकेचा दर्जा
प्रतिनिधी/ अथणी
अथणी नगरपरिषदेला नगरपालिकेचा दर्जा देण्यात आल्याची अधिकृत घोषणा होताच शहरात जल्लोष साजरा झाला. शिवकुमार सवदी व माजी नगरपरिषद अध्यक्ष दिलीप लोणारे यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषद सदस्य व कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात फटाके फोडून व साखर वाटून आनंदोत्सव साजरा केला. नगरपरिषदेला नगरपालिकेचा दर्जा मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावणारे आमदार लक्ष्मण सवदी यांचा यावेळी जयघोष करण्यात आला.
शिवकुमार सवदी म्हणाले, तांत्रिक अडचणींमुळे रखडलेली अथणीकरांची ही जुनी मागणी आमदार लक्ष्मण सवदी यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे पूर्ण झाली असून, यामुळे शहराच्या विकासाला गती मिळेल, असे सांगितले. माजी अध्यक्ष दिलीप लोणारे म्हणाले, 1853 साली स्थापन झालेली अथणी नगरपरिषद आज नगरपालिकेत रुपांतरित झाली आहे. यासाठी आमदार लक्ष्मण सवदी यांचे अथणीकरांच्यावतीने आभार मानतो. भविष्यात नगरसभेचे महानगरपालिकेत रुपांतर व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. या प्रसंगी नगरसेवक मल्लेश हुद्दार, राजशेखर गुडोडगी, नरसू बडकंबी यांच्यासह अनेक पदाधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.