Karad Crime : ओगलेवाडीत तरुणाचा चाकूने वार करून खून
परिसरात तणावपूर्ण वातावरण
कराड : ओगलेवाडीत (ता. कराड) येथे गुरुवारी दुपारी रेकॉर्डवरील संशयित असलेल्या बाळू सूर्यवंशी (वय ३३) याचा त्याच्याच नात्यातील युवकाने मुख्य चौकात चाकुने सपासप वार करून खून केला. या घटनेनंतर - संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली असून परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बाळू सूर्यवंशी आणि त्याच्याच नात्यातील एका - युवकामध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद निर्माण झाला होता. गुरुवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास दोघांची गावच्या मुख्य चौकात आमनेसामने गाठ पडली. यावेळी बाद चिघळताच संशयित युवक संतापाच्या भरात स्वतः जवळील चाकू काढून तो बाळूबर वार करू लागला, पाठ, पोटावर सलग बार झाल्याने बाळू रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. बार इतके खोलबर होते की बाळू गंभीर जखमी झाला.
घटना पाहताच नागरिकांनी धाव घेत जखमीला तातडीने उपजिल्हा रुग्णालयात हलवले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, आरोपी युवक घटनास्थळावरून फरार झाला असून त्याच्या शोधासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना झाली आहेत.खूनाच्या घटनेने ओगलेवाडीत तणाव निर्माण झाला असून पोलिसांनी परिसरात बंदोबस्त वाढवला आहे. रात्री उशिरापर्यंत कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरु होती. तर या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याची माहिती देण्यात आली.