कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कमिशनच्या आशेपोटी तरुणाई सायबर गुन्हेगारांच्या पाठीशी!

12:27 PM Jul 28, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बनावट अकाऊंट उघडून देण्यास हातभार : 1 कोटी व्यवहारावर 60 हजारांचे आमिष : चार महिन्यांत सायबर गुन्हेगारांना मदत करणाऱ्या बेळगाव येथील पाचहून अधिक तरुणांना अटक

Advertisement

बेळगाव : आजवर जामतारा, नोयडा, मुंबई, पुणे येथे बसून सर्वसामान्य नागरिकांना ठकविणारे सायबर गुन्हेगार आता गावोगावी पोहोचले आहेत. कमिशनच्या आशेपोटी तरुणाई सहजपणे त्यांच्या गळाला लागू लागली आहे. चार महिन्यांत सायबर गुन्हेगारांना मदत करणाऱ्या बेळगाव येथील पाचहून अधिक तरुणांना अटक झाली आहे. सायबर गुन्हेगारांना मदत करण्यासाठी बेळगाव येथील अनेक तरुणांनी आपल्या नावे बँक खाती उघडून दिली आहेत. असे तरुण एक दिवस अडचणीत येणार हे निश्चित आहे. गुरुवार दि. 24 जुलै रोजी चेन्नई येथील एसीपी प्रियदर्शिनी यांच्या नेतृत्वाखाली बेळगावला आलेल्या तामिळनाडू पोलिसांच्या एका पथकाने तिघा जणांना ताब्यात घेऊन त्यांना चेन्नईला नेले. स्थानिक सायबर क्राईम विभागाच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली.

Advertisement

अनिल कोल्हापुरे, राहणार कुवेंपूनगर, रोहन कांबळे, राहणार गणेशपूर, सर्वेश किवी, राहणार आरपीडी क्रॉस अशी त्यांची नावे आहेत. बनावट कंपन्यांच्या नावे बँकेत करंट अकाऊंट उघडून सायबर गुन्हेगारांना मदत केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. कर्नाटकातील बेंगळूर, तुमकूर येथील सायबर क्राईम प्रकरणातही या तरुणांचा सहभाग असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. चेन्नईत एकूण 27 गुन्हे त्यांच्यावर नोंद आहेत. बेळगाव येथील या तरुणांनी थेट सावजाला ठकविले नाही तर ठकविण्यासाठी सायबर गुन्हेगारांना करंट अकाऊंट उघडून देऊन मदत केली आहे. यापूर्वी बेळगाव येथील सायबर क्राईम विभागाचे अधिकारी फसवणूक प्रकरणांच्या तपासासाठी नवी दिल्ली, नोयडा, राजस्थान, गुजरात आदी ठिकाणी पोहोचत होते.

बँक खात्यावरून गुन्हेगारांचा माग काढण्याचा प्रयत्न केला जात होता. ज्यांच्या नावे खाती आहेत, ते दिव्यांग किंवा वयोवृद्ध, अंध आढळून येत होते. पाच हजारच्या बदल्यात आपले आधारकार्ड व इतर कागदपत्रे झोपडपट्टीतील गरीब सायबर गुन्हेगारांच्या ताब्यात देतात. ठकविणाऱ्या गुन्हेगारांपर्यंत पोहोचता आले नसले तरी ज्या खात्यावर रक्कम जमा केली त्यांचा माग काढत पोलीस त्यांच्यापर्यंत पोहोचतात. तेथे पोहोचल्यानंतर त्यांनाही धक्का बसतो. 80 वर्षीय वृद्धाच्या नावे ते खाते असते. पैसे देऊन कोणी कागदपत्रे घेऊन गेली, याचीही माहिती त्यांना नसते. आता परिस्थिती बदलली आहे. सायबर गुन्हेगार सावजांना ठकवितात, याची माहिती असूनही तरुणाई कमिशनच्या आशेपोटी गुन्हेगार सांगतील त्या पद्धतीने बँक खाते उघडून त्यांना देतात. चेन्नई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एखाद्या करंट अकाऊंटवर एक कोटीचा व्यवहार झाल्यानंतर अकाऊंट ज्याच्या नावे आहे, त्याला 60 हजार रुपये कमिशन देण्याची बोलणी झाली होती.

गुन्हेगार वेगवेगळ्या पद्धतीने व्यवहार ठरवतात. 10 मार्च 2025 रोजी मंगळूर येथील सीईएन पोलिसांनी अनुप विजय कारेकर, राहणार रामदेव गल्ली, वडगाव, अविनाश विठ्ठल सुतार, राहणार ताशिलदार गल्ली या दोघांना सायबर गुन्हेगारांना मदत केल्याच्या आरोपावरून ताब्यात घेतले होते. त्यांच्याजवळून 19 बँक खात्यांसंबंधीची कागदपत्रे, 18 चेकबुक, 15 एटीएम कार्ड व 14 सीमकार्ड जप्त केली होती. झटपट पैसे कमाविण्यासाठी गुगलवर सर्च करताना बँक खाती उघडून दिल्यास कमिशन देण्यात येईल, अशी माहिती असलेली एक लिंक दोनपैकी एका तरुणाला मिळाली होती. त्यामुळे तो सायबर गुन्हेगारांच्या संपर्कात आला. त्यांना मदत करण्यासाठी एकापाठोपाठ एक 19 खाती उघडून देण्यात आली. दक्षिण कन्नड जिल्हा सीईएनचे पोलीस उपनिरीक्षक युनुस गड्डेकर व सहकाऱ्यांनी ही कारवाई केली होती.

डिजिटल अरेस्टसाठी सायबर गुन्हेगार कमिशनची आशा दाखवून तरुणाईला जाळ्यात ओढतात. मंगळूर येथील एका वृद्ध शेतकऱ्याला डिजिटल अरेस्टच्या नावे ठकविले होते. या प्रकरणात सायबर गुन्हेगारांना बेळगावातून मदत मिळाली होती. ठकविणारे गुन्हेगार लखनौमध्ये होते. या प्रकरणाचा माग काढत मंगळूर सीईएनचे अधिकारी बेळगावपर्यंत पोहोचले होते. दि. 24 जुलै रोजी बेळगावातील तरुणांची झालेली धरपकड ही दुसरी घटना आहे. कमिशनच्या आशेपायी अनेक तरुणांनी सायबर गुन्हेगारांना आपल्या नावे बँक खाती उघडून दिल्याचा संशय आहे. एखाद्या गुन्ह्यानंतर पैसा कोणत्या बँक खात्यात जमा केला आहे? त्याचा माग काढीत अधिकारी गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. कमिशनच्या आशेपायी खाती उघडून देणारे तरुण सहजपणे सायबर क्राईम विभागाच्या जाळ्यात अडकतात. प्रत्यक्षात डिजिटल अरेस्टच्या नावाखाली सर्वसामान्यांना गंडविणारे गुन्हेगार मात्र पोलीस यंत्रणेच्या हाती लागत नाहीत.

खोटी बँक खाती उघडून देऊ नयेत

अरब राष्ट्र किंवा कंबोडिया आदी देशात बसून सायबर गुन्हेगार हे खेळ खेळत असतात. ज्यांच्या नावे बँक खाते आहे, ते मात्र कायद्याच्या कचाट्यात अडकतात. बेळगाव येथील तीन तरुणांना अटक केल्यानंतर तरुणाईने सायबर गुन्हेगारांना मदत करण्यासाठी खोटी बँक खाती उघडून देऊ नयेत, असे आवाहन पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी केले आहे. सायबर गुन्हेगारांचे उपद्रव वाढले आहेत. अनोळखी व्यक्तींकडून येणारे लिंक कोणीही ओपन करू नयेत, सायबर गुन्हेगारांपासून सतर्कता बाळगली तरच फसवणूक होणार नाही, असे पोलीस आयुक्तांनी सांगितले. कमिशनच्या आशेपायी आणखी किती तरुणांनी गुन्हेगारांना मदत करण्यासाठी बँक खाती उघडली आहेत, तेही एक दिवस अडचणीत येणार हे निश्चित आहे. त्याआधीच सायबर क्राईम विभागाशी संपर्क साधून घडला प्रकार कळवला तर अशा युवकांची फसवणूक टाळता येणार आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article