युवकांनी व्यसनापासून दूर राहून प्रगती साधावी : प्रा.सी.एम.त्यागराज
आरसीयूतर्फे युवा महोत्सवाचे आयोजन
बेळगाव : अमलीपदार्थ आणि दारूच्या व्यसनामुळे अनेक कुटुंबांना मनस्ताप सहन करावा लागतो. याचा परिणाम त्यांच्या मुलांच्या शिक्षणावरही होत असतो. व्यसनमुक्त समाज निर्माण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. युवा महोत्सव तरुणांना प्रेरणा देत असतात आणि प्रेरणा हीच आपल्या जीवनातील ताकद आहे, असे विचार राणी चन्नम्मा विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. सी. एम. त्यागराज यांनी मांडले.
बेळगाव जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, युवा सक्षमीकरण आणि क्रीडा विभाग व राणी चन्नम्मा विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बेळगाव जिल्हास्तरीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर बेळगाव उत्तरचे आमदार असिफ सेठ, माळमारुती पोलीस स्थानकाचे निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची, कुलसचिव संतोष कामगौडा, युवा सक्षमीकरण विभागाचे प्रमुख बी. श्रीनिवास, संगोळ्ळी रायण्णा कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस. सी. पाटील, मल्लेश चौगुले, सिद्दण्णा दुरदुंडी, विठ्ठल मुर्कीभावी यासह इतर उपस्थित होते.
आमदार असिफ सेठ म्हणाले, तरुण पिढीने मोबाईलच्या विळख्यात न अडकता शिक्षणाला महत्त्व दिले पाहिजे. त्यांनी क्रीडा, सांस्कृतिक महोत्सव यासह इतर उपक्रमांमध्ये हिरीरीने सहभाग घेतला पाहिजे. शिक्षक, आई-वडील तसेच समाजाची स्वप्ने सत्यात उतरवण्यासाठी विद्यार्थ्यांनी सखोल अभ्यास करून यश संपादन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
जे. एम. कालीमिर्ची म्हणाले, पोलीस ठाणे पूर्वी तरुणाईसाठी भीतीचे केंद्र होते. परंतु, 112 या हेल्पलाईनद्वारे पोलीस विभाग युवकांच्या दाराशी आला आहे. जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी पोलीस विभाग नेहमीच सक्रिय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी उपस्थित होते.