For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अखेर म. ए. समितीने महामेळावा यशस्वी केलाच!

01:03 PM Dec 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
अखेर म  ए  समितीने महामेळावा यशस्वी केलाच
Advertisement

पोलिसांच्या ताब्यात असतानाही मांडले ठराव : एपीएमसीमधील रयत भवन बनले व्यासपीठ

Advertisement

बेळगाव : कर्नाटक सरकारने पोलिसीबळाचा वापर करून महामेळावा चिरडण्याचा प्रयत्न केला. कार्यकर्त्यांची धरपकड, तसेच दहशत माजविण्याचा प्रकार घडला. परंतु, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी मराठीबाणा दाखवत सरकारी इमारतीतच मेळावा भरविला. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एपीएमसीमधील रयत भवनामध्ये भाषणे करून मेळावा यशस्वी केला. त्यामुळे कितीही दडपशाही केली तरी महाराष्ट्र एकीकरण समितीचा कार्यकर्ता कधीही मागे हटणार नाही, हे यातून दिसून आले.

कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून बेळगावमध्ये सुरू झाले. मराठी भाषिकांना डिवचण्यासाठी कर्नाटक सरकारचा हा आततायीपणा सुरू असल्याने त्याला महामेळाव्यातून प्रत्युत्तर दिले जाणार होते. यासाठी महिनाभर आधी मध्यवर्ती म. ए. समितीने जिल्हा प्रशासन, तसेच पोलीस प्रशासनाकडे रितसर परवानगी अर्ज दिला होता. महामेळावा करण्यास पोलीस प्रशासनाने रविवारी तोंडी परवानगी दिली होती. त्यामुळे व्हॅक्सिन डेपो येथे महामेळाव्याची महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी तयारी सुरू केली.

Advertisement

परंतु, सोमवारी सकाळी खानापूर येथील म. ए. समितीच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यापाठोपाठ महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या घरांसमोर पहारा लावला. महामेळाव्यासाठी किती वाजता निघणार, अशी चौकशी त्यांच्याकडे केली जात होती. त्यांना चकवा देत म. ए. समितीचे पदाधिकारी व्हॅक्सिन डेपो परिसरात पोहोचले व संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणांनी परिसर दणाणला.व्हॅक्सिन डेपो परिसरात दाखल होणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेऊन त्यांची रवानगी एपीएमसी पोलीस स्थानकात केली. टप्प्याटप्प्याने सर्व कार्यकर्त्यांना एपीएमसी येथील रयत भवन येथे ठेवण्यात आले. ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांची संख्या मोठी असल्यामुळे त्या ठिकाणीच मेळावा भरविण्याचा निर्णय झाला. सरकारी इमारतीत मेळावा घेण्याची ही पहिलीच नामीसंधी समितीला मिळाली. या संधीचे सोने करत पदाधिकाऱ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली.

व्यासपीठावर म. ए. समितीचे नेते रमाकांत कोंडुसकर, अॅड. एम. जी. पाटील, मालोजी अष्टेकर, रणजित चव्हाण-पाटील, नेताजी जाधव, मनोहर किणेकर, प्रकाश मरगाळे, आर. एम. चौगुले, शुभम शेळके, रामचंद्र मोदगेकर, अंकुश केसरकर, प्रकाश शिरोळकर, अॅड. अमर येळ्ळूरकर यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी रेणू किल्लेकर, कमल मन्नोळकर, प्रकाश अष्टेकर, सतीश पाटील, विनायक पाटील यांसह इतर मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून सीमाप्रश्नासंदर्भात आपली भूमिका मांडली.

यावेळी शिवानी पाटील, रुपा नावगेकर, अनुराधा सुतार, संजय शिंदे, श्रीधर जाधव, सचिन केळवेकर, श्रीकांत कदम, सुरेश कुडूचकर, रवळू वड्डेबैलकर, लक्ष्मण पाटील, भीमसेन करंबळकर, सुनील पाटील, कृष्णा मन्नोळकर, संतोष बांडगी, मारुती पाटील, विठ्ठल पाटील, यल्लाप्पा रेमाण्णाचे, मनोहर जायाण्णाचे, अरुण अकनोजी, शिवाजी नांदूरकर, अंकुश पाटील, विनायक पाटील, मुकुंद डुकरे, शिवाजी पाटील, महेश टंकसाळी, रमेश माळवी, शंकर कोनेरी, सुनील पाटील, रामा शिंदे, डी. बी. पाटील, शिवराज पाटील, दत्ता उघाडे, दयानंद उघाडे, अमोल देसाई, नागेश बोभाटे यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

94 वर्षांचे ज्येष्ठ सीमासत्याग्रही मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी

एपीएमसीमधील रयत भवनात झालेल्या या मेळाव्याला बेळगाव शहर, तालुका, तसेच खानापूरमधील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. खानापूर तालुक्यातील निडगल गावचे ज्येष्ठ सीमासत्याग्रही वयाच्या 94 व्या वर्षी व्हॅक्सिन डेपो येथे महामेळाव्यासाठी उपस्थित होते. यावेळी त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे एपीएमसीमधील रयत भवनात झालेल्या मेळाव्याचे अध्यक्षस्थान या ज्येष्ठ सीमासत्याग्रहीला देण्यात आले. शंभरीकडे वाटचाल करणाऱ्या सीमावासियांना आजही सीमाप्रश्न सुटावा, ही एकच इच्छा उरामध्ये असल्याचे यातून दिसून आले.

Advertisement
Tags :

.