युवकांनी एकत्रित येऊन सीमालढा खांद्यावर घ्यावा!
आमदार रोहित आर. आर. पाटील यांचे आवाहन : तालुका युवा आघाडीचा मेळावा उत्साहात
बेळगाव : राजमाता जिजाऊ आणि शिवरायांच्या पराक्रमाने स्वराज्य घडले. त्याप्रमाणे येत्या काळात मराठी अस्मितेसाठी एकत्रित येऊन जागृत व्हावे. ही सीमा चळवळ आता घराघरापर्यंत पोहोचली पाहिजे, यासाठी युवकांनी एकत्रित येऊन हा सीमालढा खांद्यावर घेतला पाहिजे, असे प्रतिपादन महाराष्ट्रातील युवा आमदार रोहित आर. आर. पाटील यांनी केले. तालुका म. ए. समिती व युवा आघाडीतर्फे रविवारी महात्मा फुले रोड, शहापूर येथील मराठा सांस्कृतिक भवनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या युवा मेळाव्यात ते बोलत होते. राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार मनोहर किणेकर होते. व्यासपीठावर तालुका म. ए. समितीचे सरचिटणीस अॅड. एम. जी. पाटील, युवा आघाडीचे अध्यक्ष राजू किणेकर, माजी आमदार दिगंबर पाटील, माजी महापौर मालोजी अष्टेकर, समिती नेते प्रकाश मरगाळे, रमाकांत कोंडुसकर, आर. एम. चौगुले, युवा समितीचे शुभम शेळके, अंकुश केसरकर, अॅड. तृप्ती सडेकर उपस्थित होते.
आमदार रोहित पाटील म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्यानंतर अस्मिता दडपण्याचे काम प्रत्येक ठिकाणी झाले आहे. मात्र ते हाणून पाडण्याचे कार्य युवकांनी केले आहे. मराठी युवकांनी अस्मिता गहाण न ठेवता सीमालढ्याचे कार्य तडीस न्यावे. सीमालढा पिढ्यान पिढ्या सुरू आहे. आज संघर्षाची पद्धत बदलली आहे. या बदलत्या पद्धतीनुसार सीमालढ्याला बळकटी द्या. येत्या काळात या प्रश्नाचा कायमचा शेवट करुया, असेही त्यांनी स्पष्ट केले. सीमाभागातील बांधवांवरील अन्याय, अत्याचार दूर करण्यासाठी जागृत राहून युवकांना चांगले दिवस आणण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. महाराष्ट्र विधीमंडळ सदस्य म्हणून माझी ती जबाबदारी आहे. महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीवेळी मला सीमाभागातील महाराष्ट्र एकीकरण समितीने पहिल्यांदा पाठिंबा दिला. म. ए. समितीचे कार्यकर्ते माझ्या विजयासाठी रात्रंदिवस राबले. स्वर्गीय आबांनी सीमालढ्यासाठी स्वत:ला झोकून दिले. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत तासगाव मतदारसंघाबरोबर सीमालढ्यासाठी कायम लढत राहिन, अशी ग्वाही त्यांनी दिली.
आपली संस्कृती, भाषा टिकविण्यासाठी एकसंध राहण्याची गरज
कोल्हापूर येथील प्रा. मधुकर पाटील म्हणाले, ज्या शब्दाला शस्त्राची धार आहे तो युवक आहे. अशा युवकांना एकत्रित करून सीमालढ्याला बळकटी द्यावी, जिजाऊ आणि स्वामी विवेकानंदांचा आदर आणि आदर्श डोळ्यासमोर ठेवून भाषा, संस्कृती यांचे जतन केले पाहिजे. सीमालढा न्यायालयात सुरू आहे. अशा परिस्थितीत आपली संस्कृती, भाषा टिकविण्यासाठी एकसंध राहण्याची गरज आहे. मराठी माणसांमध्ये जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे. फक्त गरज आहे ती आमच्यातील अस्मिता जागे करण्याची. विचारधारा टिकवून ठेवून संघर्षाची भूमिका घेतली पाहिजे, यासाठी युवकांनी एकत्रित आले पाहिजे. शिवराय रयतेसाठी जगले म्हणून स्वराज्य निर्माण झाले. तो आदर आणि आदर्श डोळ्यासमोर ठेवून खऱ्या अर्थाने युवकांनी जगले पाहिजे. मराठी भाषा, संस्कृती संवर्धनासाठी एकत्रित येणे ही काळाची गरज असल्याचेही स्पष्ट केले.
जिजाऊंच्या लेकी आज प्रत्येक क्षेत्रात पुढे
अॅड. तृप्ती सडेकर म्हणाल्या, जिजाऊंच्या लेकी आज प्रत्येक क्षेत्रात पुढे आहेत. घर, संसार सांभाळत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कार्यरत आहेत. जिजाऊ, सावित्रीबाई यांचा आदर्श आणि कार्य डोळ्यासमोर ठेवून महिला आज विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करू लागल्या आहेत. माजी आमदार मनोहर किणेकर यांनी प्रास्ताविक करताना तालुका म. ए. समिती व युवा आघाडीतर्फे युवा दिन आयोजित करण्याबाबतची भूमिका स्पष्ट केली. प्रारंभी आमदार रोहित आर. आर. पाटील व मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेचे पूजन झाले. त्याबरोबर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. देशातील युवा आमदार होण्याचा मान मिळविलेल्या आमदार रोहित आर. आर. पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणांनी सभागृह दणाणला
आमदार रोहित आर. आर. पाटील सभागृहात प्रवेश करताच संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणांनी सभागृह दणाणला. बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, रहेंगो महाराष्ट्र मे नही तो जेल मे, कोण म्हणतंय देत नाही घेतल्याशिवाय रहात नाही, आदी घोषणांनी सभागृह दुमदुमला. याप्रसंगी म. ए. समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक, सीमाबांधव यासह खानापूर, चंदगड, आजरा, गडहिंग्लज येथील राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.