For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गांधीनगरजवळ भरधाव ट्रकची प्रवाशांना धडक : एकाचा मृत्यू

12:14 PM Jan 13, 2025 IST | Tarun Bharat Portal
गांधीनगरजवळ भरधाव ट्रकची प्रवाशांना धडक   एकाचा मृत्यू
Advertisement

दोघे गंभीर जखमी : शनिवारी रात्री घडला अपघात

Advertisement

बेळगाव : भरधाव ट्रकची रस्त्याशेजारी बसच्या प्रतीक्षेत उभ्या असलेल्या तिघा जणांना ठोकरून रस्त्याशेजारी थांबलेल्या ट्रकला धडक बसली. शनिवारी रात्री उशिरा गांधीनगरजवळील बेळगाव टिंबर्ससमोर ही घटना घडली. या अपघातात बेंगळूर येथील एका युवकाचा मृत्यू झाला तर अन्य दोघे जण जखमी झाले. शनिवार दि. 11 जानेवारी रोजी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास बेळगावहून बेंगळूरकडे जाणाऱ्या रोडवर ही घटना घडली. वाहतूक उत्तर विभाग पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली असून पोलीस निरीक्षक एस. एफ. तोटगी, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बी. बी. चौगला व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

फिलिप्स कनकराजू (वय 39) रा. जयनगर-बेंगळूर असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी युवकाचे नाव आहे. संतोष मडिवाळप्पा जेल्ली (वय 34) रा. पोलीस हेडक्वॉर्टर, त्याचा मित्र अब्दुलगफार इमामसाब शिरकोळ (वय 33) रा. न्यू वीरभद्रनगर अशी जखमींची नावे असून त्यांच्यावर खासगी इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत.  सुरुवातीला जखमींना सिव्हिल हॉस्पिटलला हलविण्यात आले. उपचाराचा उपयोग न होता रात्री 11.45 वाजण्याच्या सुमारास फिलिप्सचा मृत्यू झाला. यासंबंधी एमएच 12 डीटी 5392 क्रमांकाचा ट्रकचालक ज्ञानेश्वर आसाराम सवनी, रा. तिगाव, ता. वडवणी, जि. बीड याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 281, 125(बी) व 106 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आले आहे. या अपघातानंतर घटनास्थळी गर्दी जमली होती. काकतीहून हलग्याकडे जाणाऱ्या ट्रकने रस्त्याशेजारी थांबलेल्या तिघा जणांना ठोकरून थांबलेल्या ट्रकला धडक दिली. त्यामुळे हा अपघात घडला.

Advertisement

बसच्या प्रतिक्षेत असलेल्या प्रवाशाला धडक

या अपघातात मृत्युमुखी पडलेला फिलिप्स हा बेंगळूरला जाण्यासाठी बसच्या प्रतीक्षेत गांधीनगर येथे उभा होता. त्याचवेळी बेंगळूरला जाणाऱ्या संतोष जेल्ली या मित्राला सोडण्यासाठी अब्दुलगफार आपल्या मोटारसायकलवरून आला होता. हे तिघेजण मोटारसायकल उभी करून रस्त्याशेजारी थांबले होते. भरधाव ट्रकने त्यांना आदळल्याने एकाचा मृत्यू झाला तर अन्य दोघे जखमी झाले.

Advertisement
Tags :

.