विजापुरात तरुणाची गोळ्या झाडून हत्या
वार्ताहर/विजापूर
दिवसाढवळ्या कारवर गोळीबार करून तरुणाची निर्घृण हत्या केल्याची घटना अरकेरी गावातील मनावरदो•ाr, ता. तिकोटा, जि. विजापूर येथे घडली आहे. सतीश प्रेमसिंग राठोड असे मृताचे नाव आहे. रमेश चव्हाण व इतरांकडून हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप आहे. घटनास्थळी हल्लेखोराच्या कानाचा तुकडा पडल्याचे आढळून आले आहे. मुलीच्या विवाहाच्या मुद्यावरून थेट खुनाचे कृत्य घडल्याचा आरोप सतीशचे वडील प्रेमसिंग चव्हाण यांनी केला आहे. या घटनेने तिकोटा तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. रमेश चव्हाण याच्या मुलीशी सतीशचा विवाह लावून देण्यासंबंधी समाजातील पंचांच्या उपस्थितीत विचारणा करण्यात आली होती.
मागील दीड वर्षापूर्वी रमेशच्या मुलीशी सतीशचा विवाह करण्यासंबंधीचा मुद्दा उपस्थित झाला होता. तेव्हा रमेशने आपल्या मुलीचा विवाह सतीशशी लावून देणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले होते. त्यानंतर वर्षभरापूर्वी रमेशची मुलगी विहिरीत पडून मृत झाल्याचे सांगितले जात होते. ज्याला सतीशच कारणीभूत असल्याचा संशय रमेश व त्याच्या साथीदारांना होता. या रागातून सतीशवर गोळीबार करून खून करण्यात आला आहे, असा आरोप प्रेमसिंग चव्हाण यांनी केला आहे. पोलीस तपासानंतर सतीशच्या खुनाचे सत्य बाहेर येण्याची शक्यता आहे. एसपी लक्ष्मण निंबरगी आणि अधिकाऱ्यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.