देश घडवण्यासाठी युवकांना कुशल बनवलं पाहिजे!
राजधानी सातारा येथे वाढदिवस उत्साहात : माझ्यावर असेच प्रेम राहू द्या -डॉ. किरण ठाकुर यांची भावनिक साद
महात्मा गांधींनी खेड्याकडे चला असा संदेश दिला होता. त्याप्रमाणे आपण खेड्यापाड्यातल्या जनतेचं उत्पन्न वाढावे म्हणून काम करत आहोत. खेड्यात कॉलेजीस सुरू केली आहेत. 32 गावे गोव्यातल्या सरहद्दीवरची दत्तक घेतली आहेत. त्या गावांतल्या युवकांना स्किल ट्रेनिंग दिलं आहे. सध्या भारताकडे जगाच्या नजरा लागल्या आहेत. आपला देश युवकांचा देश म्हणून ओळखला जातो. त्यांच्या हाताला स्किल मिळून कौशल्य उद्योगी बनवण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. जगभर पसरलेल्या मराठी माणसाला मदत मिळवून देत आहोत. मायक्रो फायनान्स मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आपला देश घडवण्यासाठी प्रत्येकाने मेहनत घेतली पाहिजे, असे आवाहन करत तरुण भारतचे सल्लागार संपादक व लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटीचे संस्थापक डॉ. किरण ठाकुर यांनी ‘माझ्यावर असेच प्रेम करत रहा’ अशीही भावनिक साद दिली.
प्रतिनिधी/ सातारा
डॉ. किरण ठाकुर यांचा वाढदिवस सोहळा सातारा येथील जिल्हा परिषद मैदानावर अभूतपूर्व उत्साहात पार पडला. हलगीच्या कडकडाटात, तुतारीच्या निनादात आणि गजी नृत्याच्या वाद्यात डॉ. किरण ठाकुर यांच्यासह मान्यवरांचे स्वागत करण्यात येत होते. राजधानी साताऱ्यासह राज्यातून आणि देशभरातील विविध मान्यवरांनी डॉ. किरण ठाकुर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. संगीत मैफिलीने वाढदिवसाचा सोहळा आणखी उंचीवर नेऊन ठेवला. वाढदिवस सोहळ्यानिमित्त दीपप्रज्वलनप्रसंगी डॉ. किरण ठाकुर यांच्यासमवेत तरुण भारतच्या संचालिका सई ठाकुर-बिजलानी, लोकमान्यचे सीईओ अभिजित दीक्षित, सीएफओ वीरसिंह भोसले, पंढरी परब, गजानन धामणेकर, अजित गरगट्टी, सुबोध गावडे, विठ्ठल प्रभू, सुशील जाधव, सातारा आवृत्तीप्रमुख दीपक प्रभावळकर, जाहिरात व्यवस्थापक संजय जाधव व इतर मान्यवर उपस्थित होते.
आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक
वाढदिवस सोहळ्यात संबोधित करताना डॉ. किरण ठाकुर म्हणाले, आपण या महाराष्ट्रात, या देशात जन्माला आलो हे आपलं भाग्य आहे. आपण सगळे भाग्यवान आहोत. आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक यांच्यासारख्या महापुरुषांच्या विचारांवर आपली वाटचाल होत आहे.
माझे वडील कॉलेजचे शिक्षण सोडून स्वातंत्र्यलढ्यात उतरले होते. तेव्हापासून त्यांची सामाजिक कार्याला सुरुवात झाली. त्यांनी गांधीजींच्या आश्रमात दिवस घालवले आहे. बेळगाव येथे वृत्तपत्र सुरू केलं ते ठळकपणे. आम्ही जिथं रहातो तिथल्या भागाला टिळकवाडी नाव दिले. लोकमान्यांचा आदर्श घेऊन शाखा काढली. लोकमान्य हे आदर्श शिक्षक होते, आदर्श सहकार तज्ञ होते, विचारवंत होते. त्यांच्या नावाने सुरू केलेल्या लोकमान्यची 100 वी शाखा त्यांच्या पुणे येथील केसरी वाड्यात सुरू केली. आज लोकमान्य व्यवसायात प्रथम क्रमांकावर आहे. 16 हजार कोटीच्या व्यवसाय केला आहे. देशभरात 220 शाखाचा विस्तार असून याचे 70 टक्के महिलांनी केले आहे. महिला बचतगटाच्या माध्यमातून ही चळवळ बांधली गेली आहे. लोकमान्य सोसायटीच्या मागच्या सहा वर्षात नव्या शाखा सुरू केल्या नव्हत्या, पण येत्या एक वर्षात 1 हजार शाखा काढण्याचा मानस आहे. त्यासाठी 1 लाख डिपॉझिट गोळा केले जाईल, असे सांगत पुढे मामा म्हणाले, लोकमान्यचा लाखो लोकांना फायदा झाला आहे. गेल्या 30 वर्षात इतर संस्थापेक्षा 2 टक्के ज्यादा व्याज आपण देत आहोत, त्याच कारण लोकमान्यची विविध क्षेत्रातील सुरू असलेली कामे. सरकारी नोकर, उद्योजक यांच्या डिपॉझिट सुरक्षा आहे. त्यांनी 1 लाख काय 1 कोटी ठेवले तरी सुरक्षित सर्व पैसे त्यांचे लोकमान्यमध्ये आहेत. सातारची युनाटेड वेस्टर्न बँक आपण पाहिली. पी. एन. जोशी त्या बँकेत होते. 4 हजार कोटी डिपॉझिट लोकांची होती. अशा बँका आपल्या हातून का गेल्या याचा विचार आपल्याला करावा लागतो. यासाठी विविध सेवा देणाऱ्या सोसायटीच्या माध्यमातून सुरक्षित ठेवी राहतात. गाव खेड्या पाड्यात जनतेचं उत्पन्न वाढवावे म्हणून आपण काम करतो आहोत. खेड्यात कॉलेज काढली आहेत. 32 गावे गोव्यातल्या सरहद्दीवर दत्तक घेतली आहेत. तिथल्या युवकांना स्किल ट्रेनिंग दिलं आहे. भारताकडे जगाच्या नजरा लागल्या आहेत. हा युवकांचा देश आहे. त्यांच्यासाठी आपण अनेक योजना सुरू केल्या आहेत. जगभर पसरलेल्या मराठी माणसाला मदत मिळवून देत आहोत. मायक्रो फायनान्स मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. हॉटेल मॅनेजमेंट, बीसीए, पॉलिटेक्निक असे व्यवसाय शिक्षण दिले जात आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्था सुरू केली. त्यांच्या प्रमाणेच माझ्या वडिलांनी 180 च्या वर शाळा काढल्या, शिक्षक घडवले. त्या शाळांतून 5 लाख विद्यार्थी बाहेर पडले आहे. काही विद्यार्थी कारखानदार आहेत. त्यांच्या माध्यमातून खेड्यातून स्किल ट्रेनिग दिलं जात आहे. हा माझा वाढदिवस साजरा केला तो एक ब्रँडिंग म्हणून नाही करत. समाजाला काही तरी देणं लागतो या भावनेतून करत आहोत. असेच आमच्यावर प्रेम करा, आशीर्वाद द्या, असे त्यांनी आवाहन केले आहे.
मामांचे प. महाराष्ट्रावर विशेष प्रेम
प्रस्ताविकात लोकमान्यचे सुशील जाधव म्हणाले, डॉ. किरण ठाकुर मामा यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण साताऱ्यात आलो. लोकमान्य टिळक यांच्या विचाराप्रमाणे लोकमान्यचे काम चालते. मामांच्याबद्दल बऱ्याच लोकांनी सांगितले, त्यांचं चैतन्यदायी व्यक्तिमत्त्व आहे. मामांना दीर्घायुष्य लाभो अशी त्यांनी प्रार्थना करत पुढे त्यांनी लोकमान्य सोसायटीचे लावलेले रोपटे आता वटवृक्ष झाले आहे. प्रसाद ठाकुर, सई ठाकुर यांच्यासह संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली चांगलं काम सुरू आहे. मामांच्या आजवरच्या प्रवासात त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. लोकमान्य सोसायटीच्या माध्यमातून विविध क्षेत्रात व्यवसाय विस्तारलेला आहे. मामांचे पश्चिम महाराष्ट्रावर विशेष प्रेम आहे. बेळगावमध्ये सुरू झालेल्या लोकमान्य सोसायटीची दिल्लीतही शाखा आहे, असे त्यांनी सांगितले.
मामांनी शेकडो कार्यकर्ते घडवले
लोकमान्यचे संचालक पंढरी परब म्हणाले, काही माणसांमध्ये कार्य करण्याची शक्ती अफाट असते. तशी कै. बाबुराव ठाकुर यांच्यामध्ये होती. आजपर्यंत त्यांनी हजारो कार्यकर्ते घडवले. लोकमान्य टिळक हे प्रेरणास्थान होते. त्यांच्या माध्यमातून मोठं कार्य घडत गेले. शिक्षणाचे महत्व ओळखून त्या काळी त्यांनी खेडोपाडी शाळा सुरू केल्या. शिक्षणपर्व सुरू केलं. बेळगाव जिल्हा सीमाभागात जगाच्या पाठीवर नेण्याच काम झालं. कॉलेजचे विद्यार्थी आज विविध क्षेत्रात चमकदार कामगिरी करत आहेत. समाजाला न्याय देण्याचे काम पत्रकारितेच्या माध्यमातून कै. बाबुराव ठाकुर यांनी केले. त्यामुळे नावलौकीक मिळवला आहे. मामांनी त्यांचा वारसा पुढे चालवला असून त्यांच्या वाढदिवसाचा हा उत्सव ‘ना भूतो ना भविष्यती’ होत आहे. त्या काळी पंतसंस्था सुरू झाल्या होत्या, त्यावेळी मी आणि माझा मित्र मामांना भेटलो, त्यांनी सोसायटीबाबत सांगून आम्हाला कामाला लागण्यास सांगितले. खेडोपाडी जाऊन आम्ही भागधारक गोळा केले. मामांनी आमच्या मागे आर्थिक पाठबळ उभं केलं. आजपर्यंत मामांबरोबर 35 वर्ष नेतृत्व आम्ही अनुभवले, असल्याचे त्यांनी सांगितले.
शिवेंद्रसिंहराजेंनी जपला स्नेह...
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सोहळ्यास उपस्थिती लावत डॉ. किरण ठाकुर यांना शुभेच्छा दिल्या. ‘तरुण भारत’ आणि लोकमान्य सोसायटीच्या माध्यमातून ठाकुर यांनी उभ्या केलेल्या समाजकार्याचे त्यांनी भरभरून कौतुक केले. आमदार शशिकांत शिंदे यांनीही शुभेच्छा देताना डॉ. किरण ठाकुर यांचे कार्य हे भल्याभल्यांना विचार करायला लावेल, असे आहे. तरुण भारत चालवताना, लोकमान्यता मिळताना त्यांनी जनसंपर्क वाढवला आहे. ज्यांच्याकडे माणसांचा समुच्चय आहे, त्यांच्याकडेच जिंकणे आहे, असेही शिंदे म्हणाले.