सावंतवाडी रेल्वेस्थानक "टर्मिनस" असल्याचा पुरावा द्या
कोकण रेल्वेच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या मागणीनंतर प्रवासी संघटनेत असंतोष
न्हावेली /वार्ताहर
कोकण रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वक्तव्यामुळे सावंतवाडी टर्मिनस प्रकरणात आता नवा वाद उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. “या ठिकाणी टर्मिनस नसून ते फक्त ‘वे-साईड स्टेशन’ आहे. ‘टर्मिनस’ हे नाव कसे पडले? याचा पुरावा द्या,” अशी मागणी थेट कोकण रेल्वे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी केल्याची माहिती समोर आली आहे.सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचा प्रश्न दीर्घकाळ रखडत असल्याने त्यासाठी पाठपुरावा करणारे मिहीर मठकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अलीकडेच संतोष कुमार झा यांची भेट घेतली होती. टर्मिनसच्या कामातील विलंब, स्थानकाचा दर्जा आणि पुढील कार्यवाही याबाबत चर्चा करताना झा यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांसमोर वरील प्रश्न उपस्थित केला. त्यामुळे टर्मिनसचा दर्जा, नाव आणि प्रकल्प रेंगाळण्यामागील कारणांवरून आता नव्याने वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.या संपूर्ण घडामोडीबद्दल नाराजी व्यक्त करत मिहीर मठकर यांनी “स्वत: वरिष्ठ अधिकारीच अशा प्रकारचे वक्तव्य करत असतील तर नागरिकांनी काय अपेक्षा ठेवावी?” असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.