विजापुरात भरदिवसा तरुणाची धारदार शस्त्रांनी हत्या
चार संशयित आरोपींकडून हल्ल्यानंतर पलायन : गांधी पोलीस स्थानकात घटनेची नोंद : पोलीस तपास सुरू
वार्ताहर/विजापूर
येथील एस. एस. मार्गावरील एस. एस. कॉम्प्लेक्समधील अमर वर्षिणी सौहार्द सहकारी संस्थेच्या कार्यालयात दुपारी 1.30 च्या सुमारास युवकाची धारदार शस्त्रांनी हत्या केल्याची घटना घडली. सुशील काळे (वय 43) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. एस. एस. कॉम्प्लेक्समधील अमर वर्षिणी सौहार्द सहकारी संस्थेच्या कार्यालयात सोमवारी दुपारी अचानक चारजण धारदार शस्त्र घेऊन आले. त्यांनी सुशील यांच्यावर हल्ला केला. त्यात सुशील रक्ताच्या थारोळ्यात पडल्याने नागरिकांत खळबळ उडाली. काहींनी तत्काळ सुशील यांना उपचारासाठी शहरातील बी.एल.डी.ई. रुग्णालयात दाखल केले. मात्र चिंताजनक स्थितीत असलेल्या काळे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे सहकारी संस्थेच्या परिसरातील नागरिकांत भितीचे वातावरण पसरले होते. घटनेची माहिती मिळताच गांधी चौक पोलिसांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला. हल्ला केल्यानंतर संशयित आरोपींनी घटनास्थळावरून पलायन केले. या हल्ल्यामागील कारण काय होते तसेच हल्लेखोर कोण होते? याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.