शिवकुमारांच्या गाठीभेटी; चर्चांना ऊत
दिल्लीतील खर्गेंच्या डिनर पार्टीत राहुल गांधी-सोनिया गांधींशी गुप्तगू झाल्याची सूत्रांची माहिती
बेंगळूर : सत्तावाटपावर सुरू असलेल्या गंभीर चर्चेदरम्यान उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी रविवारी दिल्लीत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली आहे. त्यामुळे राज्य राजकारणात जोरदार चर्चा रंगली आहे. एआयसीसीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी रविवारी दिल्लीतील आंदोलनात सहभागी होण्यासाठी आलेल्या प्रमुख नेत्यांसाठी शनिवारी रात्री डिनर पार्टीची व्यवस्था केली होती. दरम्यान, निवडक नेत्यांनाच या पार्टीसाठी आमंत्रित करण्यात आले होते. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आणि बी. के. हरिप्रसाद यांनाही आमंत्रित केले होते. दरम्यान, सिद्धरामय्या उशिरा दिल्लीत पोहोचले. डी. के. शिवकुमार यांनी शनिवारी दिल्लीत जाऊन त्यांच्या राजकीय हालचाली सुरू केल्या. कर्नाटक भवनात अनेक आमदार आणि मंत्र्यांनी डी. के. शिवकुमार यांची भेट घेऊन चर्चा केली.
नंतर, रात्रीच्या डिनर पार्टीला उपस्थित असलेले डी. के. शिवकुमार यांनी एआयसीसी अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची तिथे भेट घेतली होती. यावेळी शिवकुमार यांनी आपले युक्तिवाद वरिष्ठांपर्यंत पोहोचविले आहेत, असे सूत्रांचे म्हणणे आहे. सत्तावाटपाच्या मुद्द्यावरून कर्नाटकात बरीच चर्चा झाली आहे. डी. के. शिवकुमार यांचे निकटवर्तीय असलेले रामनगरचे इक्बाल हुसेन यांनी शिवकुमार 6 किंवा 9 जानेवारी रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील, अशी घोषणा केली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे पुत्र, विधानपरिषद सदस्य डॉ. यतींद्र यांनी राज्यात नेतृत्वात कोणताही बदल होणार नाही. सिद्धरामय्या त्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करतील, असे स्पष्ट केले आहे. हा देखील चर्चेचा विषय ठरला आहे.
गेल्या महिन्यात सिद्धरामय्या आणि शिवकुमार त्यांच्यात सत्तावाटपाबाबत वारंवार चर्चा होत होत्या. दरम्यान, परिस्थिती टोकाला पोहोचताच हायकमांड नेत्यांनी हस्तक्षेप करून सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांच्यात दोन ब्रेकफास्ट बैठका झाल्या होत्या. यानंतर सत्तावाटपाबाबत चर्चांना पूर्णविराम मिळाला होता. परंतु नेते आणि आमदारांमधील सत्तावाटपाचा वाद अजूनही चिघळत आहे. मतदानात झालेल्या गैरप्रकाराविरोधात दिल्लीत रविवारी दुपारी 2 वाजता निदर्शने करण्याचे नियोजन होते. दिल्लीला भेट दिलेल्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आंदोलनापूर्वी वरिष्ठांची भेट घेतल्याची माहिती आहे. सध्याच्या परिस्थितीवर कोणतेही मत व्यक्त न करणाऱ्या हायकमांडने सत्तावाटपावर चर्चा करण्यासाठी दुसऱ्या दिवशी बैठक घेण्याचे आश्वासन दिल्याचे वृत्त आहे.