For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हलशीत गोळीबारात तरुण ठार

12:39 PM Nov 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
हलशीत गोळीबारात तरुण ठार
Advertisement

शिकारीसाठी गेले असताना घटना : सहा जणांवर गुन्हा दाखल

Advertisement

खानापूर/हलशी : खानापूर तालुक्यातील हलशी येथे सोमवारी पहाटे 3 वाजता केलेल्या गोळीबारात एकजण ठार झाल्याची घटना घडली आहे. पहाटे 3 वाजता हलशी-बेकवाड रस्त्यावरील पुलाच्या खाली शेतवडीत गोळीबार करण्यात आला. यात अल्ताफहुसेन महमदगौस मकानदार (वय 31) हा जागीच ठार झाला आहे. गोळीबाराचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी बेळगाव उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक विकाशकुमार, जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद, अतिरिक्त पोलीस प्रमुख श्रुती एन. एस., बैलहोंगल विभागाचे उपअधीक्षक रवि नायक, नंदगड पोलीस स्थानकाचे निरीक्षक एस. सी. पाटील, खानापूर पोलीस स्थानकाचे निरीक्षक मंजुनाथ नाईक यांच्यासह श्वानपथक व ठसेतज्ञांनी घटनास्थळी पाहणी केली. जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांच्या मार्गदर्शनाखाली नंदगड पोलीस पुढील तपास करत आहेत.

हलशी येथील युवक अल्ताफहुसेन महमदगौस मकानदार याचा सोमवारी पहाटे 3 वाजता गोळीबार करून खून करण्यात आला. अल्ताफ मकानदार हा वाळू ट्रकवर हमाल म्हणून काम करत होता. खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. हलशी येथील युवक शिकार करत होते. रविवारी रात्रीही हलशी येथील काही युवक शिकारीसाठी गेले होते. त्यावेळी पहाटे 3 वाजता गोळीबार होऊन अल्ताफचा मृत्यू झाला. नंदगड पोलिसात उस्मान महबूबसुभाणी तहसीलदार, मक्तूम महबूबसुभाणी तहसीलदार, अरबाज अल्ताफ कित्तूर, मलीक खतालसाब साईवाले, इस्माईल महबूबसुभाणी तहसीलदार, महबूबसुभाणी उस्मानसाब तहसीलदार सर्व रा. हलशी या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची कसून चौकशी सुरू आहे. या खुनामागे वैयक्तिक वादाचे कारण आहे का, की मोराच्या शिकारीवरून वाद झाल्याने हल्ला करण्यात आला असावा, की चुकून गोळीबार होऊन अल्ताफचा मृत्यू झाला? याची सखोल चौकशी करण्यात येत आहे. यापूर्वीही नागरगाळी वनक्षेत्रात 2022 साली शिकार करण्यासाठी गेले असता अल्ताफसह काही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. सोमवारी पहाटे 3 वाजता हलशी-बेकवाड रस्त्यावरील पुलाच्या बाजूला असलेल्या शेतवडीत अल्ताफवर गोळीबार करण्यात आला. गोळीबारात अल्ताफ गंभीर जखमी झाल्यानंतर त्याला त्याच अवस्थेत घराकडे नेण्यात आले. थोड्याच वेळात त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Advertisement

पहाटे 4 वाजता याबाबतची माहिती नंदगड पोलिसांना देण्यात आली. नंदगड पोलीस स्थानकाचे निरीक्षक एस. सी. पाटील आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. या परिसरात पूर्णपणे नाकाबंदी करून तपास सुरू केला. सकाळी 7 वाजता बेळगाव उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक विकाशकुमार, अतिरिक्त पोलीस प्रमुख श्रुती यांच्यासह श्वानपथक आणि ठसेतज्ञ घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाची संपूर्ण माहिती घेऊन अल्ताफच्या घरच्यांची आणि नातेवाईकांची चौकशी करण्यात आली. यानंतर मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी बेळगाव येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविला. पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत. हत्येसाठी वापरण्यात आलेल्या बंदुकीचा शोध नंदगड पोलीस घेत आहेत.

सर्वजण गुन्हेगार प्रवृतीचे

नागरगाळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. त्यांच्याकडूनही संबंधितांची माहिती घेण्यात येत आहे. हे सर्वजण गुन्हेगार प्रवृतीचे असल्याचे सांगण्यात येत असून यापूर्वी शिकार आणि वाळू तस्करीबाबत गुन्हे नोंद झाल्याची माहिती नागरगाळी विभागाच्या वनाधिकाऱ्यांनी पोलिसांना दिली आहे.

Advertisement
Tags :

.