दहा महिन्यांत सव्वातीनशेहून अधिक चोऱ्या
117 गुन्ह्यांचा तपास, प्रॉपर्टी परेडमध्ये मुद्देमाल संबंधितांना परत
बेळगाव : बेळगाव शहर व तालुक्यात गेल्या दहा महिन्यांत 339 चोऱ्या, घरफोड्या, चेनस्नॅचिंग, दरोडे आदी गुन्हे घडले आहेत. यापैकी 117 गुन्ह्यांचा तपास करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांनी दिली. दहा महिन्यांत 5 कोटी 13 लाख 2 हजार 477 रुपयांच्या मुद्देमालाची चोरी झाली आहे. यापैकी 1 कोटी 67 लाख 13 हजार 555 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सोमवारी सकाळी पोलीस परेड मैदानावर प्रॉपर्टी परेडचे आयोजन करण्यात आले होते. पोलिसांनी जप्त केलेला मुद्देमाल या परेडमध्ये मांडण्यात आला होता. संबंधितांना पोलीस आयुक्तांच्या हस्ते मुद्देमाल परत करण्यात आले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना पोलीस आयुक्तांनी वरील माहिती दिली. यावेळी पोलीस उपायुक्त निरंजनराजे अरस, मार्केटचे एसीपी संतोष सत्यनाईक, खडेबाजारचे एसीपी शेखरप्पा एच., गुन्हे तपास विभागाचे एसीपी सदाशिव कट्टीमनी यांच्यासह शहरातील पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक उपस्थित होते.
1 जानेवारीपासून 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत बेळगाव शहर व तालुक्यात 339 गुन्हे घडले आहेत. यापैकी 117 गुन्ह्यांचा तपास लावून 117 जणांना अटक करण्यात आल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले. चार दरोड्यांपैकी एका दरोड्याचा छडा लागला आहे. दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. वाटमारीचे 11 गुन्हे घडले असून 6 गुन्ह्यांचा तपास करून दहा जणांना अटक करण्यात आली आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या 22 घरफोड्यांपैकी 7 गुन्ह्यांचा तपास करून दहा जणांना अटक करण्यात आली आहे. रात्रीच्यावेळी 72 चोऱ्या झाल्या आहेत. यापैकी 31 चोऱ्यांचा तपास करून 39 जणांना अटक करण्यात आल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले. आठ घरफोड्यांपैकी 2 प्रकरणांचा तपास करून दोघा जणांना अटक करण्यात आली आहे. गेल्या दहा महिन्यांत 150 हनांची चोरी झाली आहे. यापैकी 43 वाहनांचा शोध घेऊन 19 जणांना अटक करण्यात आली आहे. भुरट्या चोरीच्या 55 घटना घडल्या असून यापैकी 16 गुन्ह्यांचा तपास करून 25 जणांना अटक करण्यात आली आहे, असे पोलीस आयुक्तांनी सांगितले.
सायबर गुन्हेगारी प्रकरणांचाही छडा लावणार
आणखी अनेक गुन्ह्यांचे तपास सुरू आहेत. पंधरवड्यात आणखी काही गुन्हेगारी टोळ्यांच्या मुसक्या आवळण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सायबर गुन्हेगारी प्रकरणांचाही छडा लावण्यात येत आहे, असे पोलीस आयुक्तांनी सांगितले.