निपाणीत महामार्गावर अपघातात तरुण ठार
मृत आश्रयनगर निपाणी येथील रहिवासी
निपाणी : निपाणी महामार्गावर शहा टाईल्ससमोर अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी तरुण जागीच ठार झाला. रशीद सिकंदर मुजावर (वय 42), रा. मूळ साखरवाडी सध्या आश्रयनगर, निपाणी असे ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना मंगळवारी सकाळी 9 च्या सुमारास घडली. याबाबत निपाणी शहर पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, मृत तरुण रशीद हा बेळगाव येथील एका बँकेत कामास जाण्यासाठी आश्रयनगर येथून निघाला होता. दरम्यान महामार्गावर रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाने रशीदला जोराची धडक दिली. त्यात तो जोरात रस्त्यावर कोसळला. यात मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने जागीच गतप्राण झाला. या घटनेची माहिती मिळताच अवताडे कंपनीचे कर्मचारी, निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवराज नाईकवडी, हवालदार बी. जे. तळवार त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मृतदेह विच्छेदनासाठी महात्मा गांधी रुग्णालयात पाठविण्यात आला. यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. सदर घटनेमुळे आश्रयनगर, साखरवाडी परिसरात शोककळा पसरली.