चलवेनहट्टीजवळ अपघातात तरुण ठार
भरधाव बोलेरो पिकअपची मोटारसायकलला धडक
प्रतिनिधी/ बेळगाव
भरधाव बोलेरो पिकअप वाहनाने मोटारसायकलला ठोकरल्याने चलवेनहट्टी, ता. बेळगाव येथील एका तरुणाचा मृत्यू झाला. शनिवारी दुपारी चलवेनहट्टीजवळ ही घटना घडली आहे. काकती पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. शिवाजी आनंद राजाई (वय 28, मूळचा रा. चलवेनहट्टी, सध्या रा. किटवाड) असे त्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. तो मोटारसायकलवरून शनिवार दुपारी बेळगावला येत होता. बेळगावकडून चलवेनहट्टीकडे जाणाऱ्या बोलेरो पिकअप वाहनाची मोटारसायकलला धडक बसली. या अपघातात तो गंभीर जखमी झाला.
शिवाजीला उपचारासाठी खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले. उपचाराचा उपयोग न झाल्याने सायंकाळी 4.30 च्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. काकती पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. शिवाजी राजाई हा खासगी इस्पितळात एक्सरे टेक्निशियन म्हणून काम करीत होता. पोलीस निरीक्षक सुरेश शिंगे पुढील तपास करीत आहेत.